सीएए, एनआरसी आणि एनपीआर यावर विधायक अर्थपूर्ण आणि माहितीपूर्ण वादविवादाची गरज :उपराष्ट्रपती

0
517
The Vice President, Shri M. Venkaiah Naidu addressing the gathering at the inauguration of the Birth Centenary Celebrations of Dr. Marri Channa Reddy, in Hyderabad on December 29, 2019.

 गोवा खबर:नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी या सर्व मुद्यांवर विधायक आणि अर्थपूर्ण वादविवाद व्हायला हवा, असे सांगत जनतेने आधी या सर्व मुद्यांचा सखोल अभ्यास करुन नंतरच त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री दिवंगत डॉ. एम.चेन्ना रेड्डी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमात ते आज हैदराबाद इथे बोलत होते. लोकशाहीत हिंसेला काहीही स्थान नाही, असे सांगत आजच्या बनावट बातम्यांच्या युगात जनतेने वाहवत जायला नको, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय लोकशाही अत्यंत परिवक्व असून, कोणत्याही विषयावर अभ्यास करुन मत व्यक्त करावे, घाईघाईने कुठल्याही निष्कर्षाप्रत येऊ नये, असे नायडू म्हणाले.

कुठल्याही विषयावर मतभेद असणे गैर नाही, मात्र ते विधायक लोकशाही आणि शांततामय मार्गानेच व्यक्त व्हायला हवेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. महात्मा गांधींनीही आपला लढा अहिंसक राहिल याची कायम दक्षता घेतली होती, याची आठवण उपराष्ट्रपतींनी करुन दिली.

संसदेची प्रतिष्ठा आणि संसदेत होणाऱ्या वादविवादांचा दर्जा कायम राखणे गरजेचे आहे, असे सांगत धोरणांवर टीका होऊ शकते, मात्र वैयक्तिक टीका योग्य नाही, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात त्यांनी सुप्रशासन, भ्रष्टाचार या मुद्यांवरही भाष्य केले तसेच डॉ. रेड्डी यांच्या योगदानाचे स्मरण केले.