सीएएचे समर्थन करत पणजी काँग्रेस मंडळाचे पदाधिकारी भाजपत दाखल

0
862
गोवा खबर:नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ उद्या पणजी येथे आयोजित जाहिर सभेच्या आदल्या दिवशी सीएए वरुन काँग्रेस मुस्लिमांची दिशाभूल करून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे,असा आरोप करत पणजी काँग्रेस मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले.
पणजी काँग्रेस गट समिती अध्यक्ष प्रसाद आमोणकर,माजी गट समिती सचिव दिनेश कुबल आणि माजी युवा नेता शिवराज तारकर यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करत सकाळी काँग्रेसचा राजीनामा देऊन दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि पणजी भाजप मंडळ अध्यक्ष शुभम चोडणकर यांनी राज्य मुख्यालयात पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे स्वागत करत पक्षात प्रवेश दिला.
भाजप मध्ये प्रवेश केल्या नंतर पत्रकारांशी बोलताना प्रसाद आमोणकर म्हणाले, काँग्रेसकडून नागरिकत्व सुधारणा कायद्या बद्दल अपप्रचार सुरु आहे.काँग्रेस अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांची दिशाभूल करून त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.जेव्हा आपल्याला हा प्रकार समजला तेव्हा आपण काँग्रेस सोडून भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.आम्ही नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थना बरोबरच पणजीच्या विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.
सर्वांनी एकत्र येऊन पणजीच्या विकासासाठी काम करूया,असे आवाहन पणजीचे आमदार मोन्सेरात यांनी केले.