सिंधुदुर्ग आणि कारवारच्या मासळी विक्रेत्याना दिलासा मिळणार!

0
933
गोवा खबर: गोव्यात सद्या मासळीची आयात बंद आहे. गोव्यापासून 60 किलोमीटर अंतराच्या परिघात जे छोटे मासळी व्यवसायिक स्वत:चा व्यवसाय करतात त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही पावले निश्चितच उचलणार आहे. त्यासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. फक्त छोट्या व्यवसायिकांच्या नावाखाली मोठे मासळी व्यापारी घुसू नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. कारण एकदा मोठे व्यापारी जर घुसले तर पुन्हा फॉर्मेलिन माशांचा वाद निर्माण होऊ शकतो, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केल्यामुळे सिंधुदुर्ग मधील मच्छीमारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॅक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे. लवकरच एफडीएकडून पोलिसांच्या मदतीने अशा ठिकाणी तपासणी करून कारवाई केली जाईल. विदेशींकडून चालवले जाणारे अनेक शॅक्स, क्लब, हॉटेल्स तपासली जातील, असेही राणे यांनी मंगळवारी  जाहीर केले.
 एफडीएने पोलीस प्रमुखांना पत्र लिहिले आहे व एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन-तीन पोलीस शिपाई असलेले पथक पुरवण्याची विनंती केली आहे. पोलीस प्रमुख त्यासाठी तयार झाले आहेत. यापुढे एफडीएकडून विदेशी व्यक्तींचे धंदे तपासले जातील. एफडीएला गृहित धरता येणार नाही. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने एफडीए कारवाई करील. क्लब, शॅक्स, हॉटेल यांची स्वयंपाकगृहे तपासली जातील. तीन तारांकित ते पाच तारांकित अशा सगळ्य़ा हॉटेल्समध्ये एफडीएची पथके कधीही भेट देऊ शकतात. एफडीएचा परवाना घेतलेला नाही असे आढळल्यास स्वयंपाकगृह सिल केले जाईल, असा इशारा देखील राणे यांनी दिला आहे.
 विदेशींकडून गोव्यात केले जाणारे काही व्यवसाय म्हणजे ड्रग्स विक्री व्यवसायाची केंद्रे आहेत, असा आरोप देखील राणे यांनी केला. आरोग्य खात्यात लवकरच काही दुरुस्त्या करून अन्न व औषध प्रशासन यंत्रणेला ज्यादा अधिकार दिले जाणार आहेत हेही त्यांनी नमूद केले.