सावधान! बागा किनाऱ्यावर सापडली विषारी सागरी जेली

0
1053
गोवा खबर:वीकेंडला गोव्यात येऊन बागा किनाऱ्यावर समुद्र स्नान करण्याचा बेत आखला असाल तर सावधान.उत्तर गोव्यातील प्रसिद्ध बागा किनाऱ्यावर विषारी सागरी जेली फिश सापडली असून त्यापासून सावध रहावे,असा सल्ला किनाऱ्यांचे व्यवस्थापन पाहत असलेल्या दृष्टी मरीन या संस्थेने प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिला आहे.
बागा किनाऱ्यावर दृष्टी मरीनच्या जीव रक्षकांना विषारी सागरी जेली फिश आढळून आली आहे.पोर्तुगीज-मॅन-ऑफ-वॉर नावाची ही जेली माणसांसाठी घातक ठरण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी किनाऱ्यावर सावधगीरी बाळगावी किंवा शक्यतो पाण्यात उतरणे टाळावे,असा सल्ला दृष्टी मरीनने दिला आहे.
ही जेली ब्लू बॉटल किंवा तरंगती दहशत म्हणून देखील ओळखले जाते अशी माहिती दृष्टी मरीन तर्फे देण्यात आली आहे.बागा किनाऱ्यावर आज ही जेली दृष्टीच्या जीव रक्षकांना आढळून आल्या नंतर त्यांनी सावधगीरीचा इशारा जारी केला आहे.
ही जेली एक इंचा पेक्षाही छोटी असते.ही धोकादायक असल्याने दृष्टी मरीनने पर्यटन खात्याचे लक्ष सुद्धा याकडे वेधले आहे.
बागा किनाऱ्यावर किंवा तेथील पाण्यात ब्लू जेली असण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी किंवा पर्यटकांनी सावधगीरी बाळगावी असे दृष्टीचे मरीन तर्फे कळवण्यात आले आहे.ब्लू बॉटल नावाच्या जेलीचा डंक घातक ठरु शकतो.किनाऱ्यावर वाहून आलेल्या मृत जेलीची नांगी देखील धोकादायक असल्याने आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज असल्याचे दृष्टी मरीनचे म्हणणे आहे.