सावकारी धोरण राबविणाऱ्या  भाजप अध्यक्षांना कष्टकरी  शेतकरी  कसा ओळखता येणार ? : गिरीश चोडणकर 

0
388
गोवा खबर:भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवुन देशात सावकारी राजवट  आणण्यात व्यस्त आहे. त्यामुळेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना काल काॅंग्रेसच्या भव्य मोर्चात सामील झालेले शेकडो कष्टकरी  शेतकरी दिसले नाहीत, असा पलटवार गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. काॅंग्रेसच्या मोर्चाला अनुसरून भाजप अध्यक्षानी केलेल्या विधानावर चोडणकर यांनी  तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केली आहे.
  • काँग्रेसने सोमवारी काढलेल्या मोर्चात शेतकरी कमी आणि इतर ओढून आणलेल्यांचीच संख्या जास्त होती. शिवाय दिगंबर कामत वगळता इतर आमदार उपस्थित नव्हते. अभ्यास न करता विरोधासाठी विरोध म्हणून काँग्रेस अशाप्रकारचे मार्चे काढत आहे. ७० वर्षांत शेतकर्‍यांना लुबाडण्यासाठी नेमलेल्या दलालांची अडचण होणार म्हणूनच काँग्रेस विरोध करत आहे. जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केला होता.
भाजपला जर शेतकऱ्यांचा खराच पुळका असता तर काल आपल्या सुपीक जमिनीत आयआयटी प्रकल्प नको अशी मागणी करणाऱ्या शेळ मेळावलीतील शेतकऱ्यांना पणजीत बोलवुन मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रांगेत उभे करण्यात आले नसते असे सांगुन, डाॅ. प्रमोद सावंत यांना शेळ-मेळावलीत जावुन स्थानीकांशी चर्चा करण्याचे धाडस नाही का असा प्रश्न  चोडणकर यांनी विचारला आहे.
क्रोनी कॅपिटालीस्टांचे हित जपणाऱ्या भाजपला देशातला गरीब दिसत नाही. लाॅकडाऊन काळात हजारो मैल पायी चालत आपल्या गावी परतणाऱ्या अनेक मजुरांचे प्राण गेले त्याची माहिती केंद्रातील मोदी सरकारकडे नसल्याचे उत्तर लोकसभेत देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब जनतेच्या प्रती असलेली सरकारची असंवेदनशीलता उघड केली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेचा आक्रोश आज भाजपच्या कामावर पडत नसुन, केवळ उत्सवी वातारणात राहुन मोदींचा उदो उदो करण्याच्या आभासी दुनियेत आज भाजप सरकार वावरत आहे असा टोला  चोडणकर यांनी लगावला आहे.
काॅंग्रेस पक्षाने देश स्वतंत्र्य झाल्यानंतर भारतात अनेक प्रकल्प उभारले. रेल्वे, दळणवळण, दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवुन आणली. हरित क्रांती व धवल क्रांतीने शेतकऱ्याना उर्जा मिळाली. अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था, भाभा अणुसंधान केंद्र, स्टिल अथोरिटी ॲाफ इंडिया, आयआयएम असे अनेक प्रकल्प व संस्था स्थापन केल्या. परंतु, धनाड्यांकडुन भरघोस देणग्या घेऊन केवळ आपला स्वार्थ बघणाऱ्या भाजपने मागील सहा वर्षात देश विक्रीस काढला आहे असा आरोप  चोडणकर यांनी केला आहे.
नवा कृषी कायदा आणल्याने दलाली बंद होणार असे सांगणाऱ्या भाजप अध्यक्षांना सदर कायद्यामुळे राज्य सरकारला ९ कोटी नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे  दलाल वाटतात का हे सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
भाजपच्या जुमला राजवटीला आता जनता कंटाळली आहे. काॅंग्रेसच्या किसान मोर्चाला मिळालेला भव्य प्रतिसाद पाहुन त्यांच्या पायांखालची जमीन सरकली आहे व त्यामुळेच वैफल्यग्रस्त होऊन तानावडे हे कोविड महामारीमुळे  सदर मोर्चात सहभागी होऊ न शकलेल्या काॅंग्रेस नेत्यांवर घसरले आहेत असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे. भाजप अध्यक्षांच्या ह्या बालीश वक्तव्याची कीव येते असे  चोडणकर यांनी म्हटले आहे.
भाजपचा सर्वात जूना मित्रपक्ष असलेल्या कृषी प्रदान पंजाबच्या अकाली दलाने आज भाजपची साथ सोडली आहे याचा तानावडे व कंपुने बोध घ्यावा व आत्मपरिक्षण करावे असा सल्ला  चोडणकर यांनी दिला आहे.
काॅंग्रेस पक्ष गरीब व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध  आहे. आगामी काळात आंदोलनाची धार तिव्र करुन आम्ही जनतेला न्याय मिळवुन देणार आहोत असे  चोडणकर यांनी म्हटले आहे.