सावकारी धोरण राबवणाऱ्या  भाजपला  कष्टकरी शेतकऱ्याच्या व्यथा कळत नाहीत : गिरीश चोडणकर 

0
502
गोवा खबर: भाजप पक्ष श्रीमंतांचा उदोउदो करण्याचे धोरण राबवुन देशात सावकारी राजवट  आणण्यात व्यस्त आहे. त्यामुळेच भाजप सरकारला गरीब शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. भाजपच्या ह्या धनाड्यांच्या  प्रेमामुळेच भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना राजभवनावरील  काॅंग्रेसच्या भव्य मोर्चात सामील झालेले शेकडो कष्टकरी  शेतकरी दिसले नव्हते, अशी टिका  गोवा प्रदेश काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी रिवण येथे किसान काॅंग्रेस तर्फे आयोजीत किसान मेळाव्यात बोलताना केली. 
काॅंग्रेस पक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडवण्यास वचनबद्द आहे. आज आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी पंजाब-हरयाणा ह्या कृषीप्रधान राज्यांत शेतकऱ्यांबरोबर रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घेई पर्यंत आमचा लढा चालुच राहणार असल्याचे  चोडणकर म्हणाले.
भाजपला जर शेतकऱ्यांचा खराच पुळका असता तर गोव्यातील ऊस, काजू, सुपारी, नारळ तसेच भातशेती करणाऱ्या गोमंतकीय शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या  ऐकुन घेण्यासाठी मागच्या आठवड्यात गोव्यात भाजपची  जाहिरतबाजी करण्यास आलेले  केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर का भेटले नाहीत असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी यावेळी विचारुन, भाजपने आणलेल्या नव्या कायद्याने विवीध पिकांसाठी मिळणारी  सरकारी आधारभुत किम्मत यापुढे बंद करुन शेतकऱ्यांना मोठ्या उद्योगपती व व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचे कारस्थान  भाजप सरकारने आखल्याचा दावा केला.
नवीन शेतकरी कायद्यानुसार यापुढे कांदा, बटाट, कडधान्ये, डाळी या जीवनावश्यक वस्तुंच्या यादीतुन वगळण्यात आल्या आहेत. यापुढे जनतेला या वस्तुंचे भाव धनाड्य व्यापाऱ्यांच्या मर्जीनुसार फेडावे लागतील असा गंभीर इशारा  कामत यांनी दिला.
भाजपचा सर्वात जूना मित्रपक्ष असलेल्या कृषी प्रधान पंजाबच्या अकाली दलाने आज भाजपची साथ सोडली आहे  याचा भाजप नेत्यांनी बोध घ्यावा व आत्मपरिक्षण करावे असा सल्ला कामत यांनी या मेळाव्यात बोलताना दिला.
क्रोनी कॅपिटालीस्टांचे हित जपणाऱ्या भाजपला देशातला गरीब दिसत नसुन, लाॅकडाऊन काळात हजारो मैल पायी चालत आपल्या गावी परतणाऱ्या अनेक मजुरांचे प्राण गेले त्याची माहिती केंद्रातील मोदी सरकारकडे नसल्याचे उत्तर लोकसभेत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब जनतेच्या प्रती असलेली सरकारची असंवेदनशीलता उघड केली आहे. त्यामुळेच सामान्य जनतेचा आक्रोश आज भाजपच्या कामावर पडत नसुन, केवळ उत्सवी वातारणात राहुन मोदींचा उदो उदो करण्याच्या आभासी दुनियेत आज भाजप सरकार वावरत आहे असा टोला खासदार फ्रांसीस सार्दिन  यांनी यावेळी बोलताना हाणला.
काॅंग्रेस पक्षाने देश स्वतंत्र्य झाल्यानंतर भारतात अनेक प्रकल्प उभारले. रेल्वे, दळणवळण, दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवुन आणली. हरित क्रांती व धवल क्रांतीने शेतकऱ्याना उर्जा मिळाली. अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था, भाभा अणुसंधान केंद्र, स्टिल अथोरिटी ॲाफ इंडिया, आयआयएम असे अनेक प्रकल्प व संस्था स्थापन केल्या. परंतु, धनाड्यांकडुन भरघोस देणग्या घेऊन केवळ आपला स्वार्थ बघणाऱ्या भाजपने मागील सहा वर्षात देश विक्रीस काढला आहे असा दावा  सार्दीन यांनी यावेळी बोलताना केला.
नवा कृषी कायदा आणल्याने दलाली बंद होणार असे सांगणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना  सदर कायद्यामुळे राज्य सरकारला ९ कोटी नुकसान होणार असे स्पष्ट सांगणारे भाजपचेच ज्येष्ठ नेते प्रकाश वेळीप हे  दलाल वाटतात का हे त्यांनी  स्पष्ट करावे अशी मागणी काॅंग्रेस किसान मोर्चाचे निमंत्रक अभिजीत देसाई यांनी केली.
भाजपच्या जुमला राजवटीला आता जनता कंटाळली असुन, काॅंग्रेसच्या किसान मेळाव्याला मिळालेला भव्य प्रतिसाद पाहुन त्यांच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आजचा मेळावा हा भाजपला सत्तेपासुन दूर नेण्याची  नांदी आहे असा विश्वास स्थानीक शेतकरी बोसत्यांव सिमोईस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
काॅंग्रेस पक्ष गरीब व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी वचनबद्ध  आहे. आगामी काळात आंदोलनाची धार तिव्र करुन आम्ही जनतेला न्याय मिळवुन देणार आहोत असे सांगे गट काॅंग्रेस अध्यक्षा जोसफीना रोड्रीगीस यांनी  यावेळी बोलताना सांगीतले.
विकेएसएस सोसायटीचे अध्यक्ष व माजी सरपंच जुझे आफोंसो यानी भाजप सरकारच्या किसान विरोधी कायद्यावर टिका केली. काॅंग्रेसचे प्रदेश सचिव रजनीकांत नाईक यांनी स्वागत केले तर सांगे युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश भगत यांनी आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन अमरनाथ पणजीकर यांनी केले.
या मेळाव्याला काॅंग्रेसचे सरचिटणीस प्रदिप नाईक, सचिव दामोदर शिरोडकर, नगरसेवक अविनाश शिरोडकर व स्थानीक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.