साळ नदीत दोन ट्रॉलर बुडाले; तिन खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात यश

0
628
गोवा खबर: दक्षिण गोव्यातील मोबोर जवळील साळ नदीत  दहा तासाच्या अवधीत दोन मच्छीमारी ट्रॉलर्स बुडण्याच्या घटना घडल्या. एका ट्रॉलरातील तीन खलाशांना दृष्टीच्या जीवरक्षकांनी जेटस्कीच्या सहाय्याने तडीवर आणले. यापैकी एक घटना रविवारी रात्री तर दुसरी घटना सोमवारी दुपारी घडली.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीप्रमाणो, मोबोर समुद्रातून या होडया साळ नदीत आत शिरताना मध्ये वाटेत असलेल्या रेतीच्या टेकडयांना  आपटल्या त्यामुळे त्यांचे इंजीन बंद होऊन त्या पाण्यात कलल्या. या दोन्ही बोटी बाहेर काढण्यासाठी तटरक्षक दलाकडून मदत घेतली गेली. मात्र सायंकाळ पर्यंत या बोटी नदीतून बाहेर काढता आल्या नव्हत्या.
कुटबण बोटमालक संघटनेचे अध्यक्ष रॉय बार्रेटो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मोबोर समुद्रातून या बोटी साळ नदीतील जेटीवर आणताना या दोन्ही दुर्घटना घडल्या. पाण्याच्या प्रवाहाने या नदीच्या मुखावर रेतीच्या टेकडया तयार होतात. त्यामुळे बोटी नदीत आणण्यात अडथळे निर्माण होतो. ओहटीच्यावेळी ही अडचण जास्त सतावते. या दोन्ही दुर्घटना होण्यामागे या रेतीच्याच टेकडया कारणीभूत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, बोटमालक संघटनेने सोमवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मच्छीमारी होडया सुखरुप नदीत आणण्यासाठी यापूर्वी सरकारने जो ब्रेक वॉटर्स प्रकल्प हाती घेतला होता तो त्वरित पूर्ण करावा अशी मागणी केली. या प्रकल्पामुळे पाण्याचा प्रवाह वाढून टेकडया वाहून जातात आणि त्यामुळे होडयांना विनाव्यत्यय नदीत येजा करणे शक्य होणार आहे. काही एनजीओंनी याला आक्षेप घेतल्यामुळे सध्या हे काम बंद पडले आहे. सरकारने आवश्यकता भासल्यास वाटाघाटी कराव्यात पण हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी या संघटनेने केली.
या दुर्घटनेत सापडलेल्या ट्रॉलरवर तांडेल विनोद उरंग आणि अशोक बारीक व पंकज बारीक असे अन्य दोन कामगार होते. ट्रॉलर पाण्यात कलंडल्याचे लक्षात आल्यानंतर दृष्टीचे जीवरक्षक सर्वेश गावकर व सुरज वेळीप यांनी जेटस्कीच्या सहाय्याने पाण्यात धाव घेत या तिघांनाही किनाऱ्यावर आणले. बोटमालक संघटनेचे पदाधिकारी पेट्रीक डिसिल्वा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, ही दुर्घटना झाल्याचे समजल्यानंतर त्वरित किनारपट्टी पोलिसांना तसेच तटरक्षक दलाला सतर्क करण्यात आले. तटरक्षक दलाच्या सहाय्याने बुडलेली बोट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.