साळजिणी : उत्कृष्ट शेतकर्‍यांचे गाव

0
752

 

सांगे तालुक्यातील साळजिणी या दुर्गम गावाला लॉकडाऊन ही काही नवीन गोष्ट नाही. नेत्रावळी वन्यजीव अभयारण्याच्या अंतर्गत भागात, समुद्रसपाटीपासून १४०० फूट उंचीवर वसलेल्या या गावात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे, येथे वस्तीला असणार्‍या  २५ च्या आसपास आदिवासी कुटुंबांना पावसाळ्याचा बहुतांश काळ आपल्या घरातच व्यतीत करावा लागतो.

असे म्हटले जाते, प्रतिकूल परिस्थिती ही काहीजणांना हतबल बनविते, तर काहीजण त्याचा योग्य उपयोग करून यशाची नवीन शिखरे गाठतात. जागतिक महामारीमुळे जेव्हा संपूर्ण राज्याचा कारभार थंडावला होता, त्यावेळी साळजिणीतील शेतकरी मात्र आपल्या कष्टातून उभारलेल्या धान्याची कापणी करण्यात व्यस्त होते. जेव्हा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात अनिश्चितता आली, तेव्हा साळजिणीजील लोकांनी सांगे तालुक्यातील लोकांना गोवा राज्य फलोत्पादन महामंडळाच्या दालनांद्वारे नऊ टनांपेक्षाही अधिक ताजी व सेंद्रिय भाजीपाल्याचा पुरवठा केला व अजूनही करत आहेत.

१/२ एकरपेक्षाही कमी असलेल्या जमिनीवर जिथे भात व बाजरीचे पीक घेतले जायचे, त्याठिकाणी कृषी खात्यातर्फे भाजीपाला लावण्यात आला. साळजिणी हे इतर गावांसारखे नाही. गेल्या चार वर्षांपासूनच्या निर्धार, अविरत प्रयस्न आणि समतोल वृत्तीच्या जोरावरच हे यश संपादन करता आले.

वन्यजीव संवर्धन क्षेत्रात, जेथे ना धड रस्ता, ना धड संपर्काचे साधन, अशा ठिकाणी राहून उदरनिर्वाह करणे म्हणजे मोठे आव्हानच आहे. चार वर्षांपूर्वी कृषी खात्याने लक्ष घालेपर्यंत, पावसाळ्यात साळजिणी इतर जगापासून विलग असायचे, या काळात तेथे भात व बाजरी पिकविली जात असे. सुरूवातीला ग्रामस्थ तयार नव्हते. परंतु, आमच्या अधिकार्‍यांनी त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित केले, त्यांचे समुपदेशन केले, त्यांच्यासोबत जेवण करून त्यांना ते आमच्यापैकीच एक असल्याची जाणीव करून दिली.

काही प्रशिक्षण सत्रांनंतर, भाताच्या पीकासाठी एसआरआय तंत्र लागू करण्यात आले. याबाबतीत त्यांचा आत्मविश्वास वाढल्यानंतर, अधिकार्‍यांनी त्यांना स्वत: गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. आज, येथील प्रत्येक घरात आपल्या शेतात वापरण्यासाठी स्वत: गांडूळ खत तयार केले जाते. या यशस्वी प्रयोगानंतर, भाजी लागवड सुरू करण्यात आली, आणि त्यानंतर या गावाने मागे वळून पाहिले नाही. गेल्या चार महिन्यांत साळजिणीच्या शेतकर्‍यांनी भाजीविक्रीद्वारे रू. ४ लाखांची व काजूविक्रीद्वारे रू. ३ लाखांची कमाई केली आहे. भोपळा, विविध प्रकारचे भोपळे, भेंडे, टोमॅटो, कांदे यासारख्या भाज्यांसहित वांग्याची एक संवर्धित जात आणि नवलकोल (गड्डो/नाब) यांची लागवड करण्यात आली. तसेच, त्यांनी स्वत:च्या वापरासाठी १० टन भाताची लागवड केली आहे. याशिवाय, महिलावर्गाने पावसाळ्यासाठी कोकम, ओटंबाची फळे व स्थानिक लाल मिरच्या यांची बेगमी केली आहे.

सध्या भात आणि स्थानिक बाजरी त्यांच्या यादीत आहेत. हवामान विचारात घेता, त्यांना बासमती बियाणे पुरवण्याची कृषी खात्याची योजना आहे.

ज्येष्ठ ग्रामस्थांपैकी एक,  श्री. अशोक वेळीप यांनी आपल्या पूर्वजांच्या शिकवणीची आठवण करुन दिली. “आमच्या पूर्वजांनी सांगितलेले आहे की, एकूण उत्पादनांपैकी फक्त १/१० भागावर आमचा हक्क आहे. उर्वरित उत्पादन, आम्ही गरजू लोकांना दिले पाहिजे. निसर्गाने आपल्याला विपुलतेने सर्व काही दिले आहे. आमच्या सुंदर झरीवर, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि पक्षी नियमितपणे येत असतात; गवारेडे, साळिंदर, नाग, अस्वले, बिबटे, चित्ता यांचा संचार असतो. औषधी वनस्पती हेच आमचे डॉक्टर आहेत. या गावाची जैवविविधता, शांती आणि समृद्धी टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. आम्हाला माहिती देण्यासाठी विकास योजना, प्रशिक्षण उपक्रम याबाबत जनजागृती कार्यक्रम नियमितपणे घेण्यात येतात”, असेही वेळीप नम्रपणे पुढे म्हणाले.

साळजिणी येथील शेतकरी निश्चितच इतर शेतकरी बंधुवर्गासाठी प्रेरणा आहेत. ते आम्हालाही काम करण्यास प्रवृत्त करतात. त्यांच्या उत्साहाला, आदरातिथ्याला व चिकाटीला माझा सलाम. ते खरेच सांगे विभागाचे उत्कृष्ट शेतकरी (सूपर फार्मर्स) आहेत.

लेखिका : श्रीमती गौरी प्रभुदेसाई, विभागीय कृषी अधिकारी, सांगे

(जान्हवी सावईकरआयएडीआयपी द्वारे संपादित)