सायबर युद्धाचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असावी – उपराष्ट्रपती

0
3102
The Vice President, Shri M. Venkaiah Naidu addressing the gathering at the 48th Foundation Day of Bureau of Police Research and Development, in New Delhi on August 27, 2018. The Minister of State for Home Affairs, Shri Kiren Rijiju and other dignitaries are also seen.

पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या 48 व्या स्थापना दिनानिमित्त उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन

गोवा खबर:सध्याच्या सायबर युगात राष्ट्रीय सुरक्षेला सायबर हल्ल्यांचा धोका आहे. या धोक्याचा सामना तंत्रज्ञानाच्या मदतीने करायला हवा, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. नवी दिल्लीत आज पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या48व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यास‍ह अन्य मान्यवरही उपस्थित होते.

हॅकिंगच्या माध्यमातून शत्रू शेकडो किलोमीटर दूरवरून देशाच्या सुरक्षेव्यवस्थेवर हल्ला करू शकतो. तंत्रज्ञानाच्या या धोक्याचा सामना करताना पोलिसांनीही नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान आत्मसात करून त्यानुसार आपले धोरण आखण्याची गरज आहे, असे नायडू यावेळी म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा विषयात पोलिसांचे ज्ञान आणि कार्यक्षमता त्यांच्यात संशोधन आणि अत्याधुनिक सुधारित उपकरणांच्या वापरावर अवलंबून आहे, त्यादृष्टीने या विभागाचे कार्य महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. आपल्याला ‘समृद्ध भारता’आधी ‘सुरक्षित भारता’ची गरज आहे. भारत सुरक्षित असला तरच तो सक्षम बनू शकेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

सायबर हल्ले रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत, असे सांगत पोलिसांची प्रतिसाद क्षमता अधिक वाढवणे गरजेचे आहे, असे नायडू म्हणाले. आणि यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी एकत्रित काम करायला हवे. त्यांच्यात समन्वय असला तरच सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे राबवता येईल, असे ते म्हणाले.

पोलीस दलाला सायबर हल्ल्यांसारख्या आव्हानांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्रांनी एकत्र येऊन यंत्रणा तयार करावी. देशातल्या सर्व पोलीस स्थानकांमध्ये सायबर फॉरेन्सिक तंत्रज्ञान विकसित केले जावे, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.