सामुदायिक खाद्य व पोषणआहार मंडळातर्फे वैयक्तिक व परिसर स्वच्छता विषयावर कार्यशाळेचे आयोजन

0
938

गोवाखबर:केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या सामुदायिक खाद्य व पोषण आहार मंडळातर्फे आज पणजी येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. वैयक्तिक व पर्यावरणीय स्वच्छता तसेच पोषक आहार या विषयावर ही राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.

 

 १ मार्च  ते १५ मार्च २०१८ या कालावधीत ‘स्वच्छता पंधरवडा’ आयोजित केला गेला; त्याचाच भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन केले गेले होते. गोवा राज्यात विविध माध्यमातून महिला व बालकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता.

 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून गोव्याच्या कृषी संचलनालयाचे संचालक नेल्सन फिगरेतो तसेच मुख्य अतिथी म्हणून बालभवनाच्या अध्यक्ष व नगरसेविका शीतल नाईक उपस्थित होत्या.

 

याप्रसंगी नेल्सन यांनी आपल्या भाषणात स्वच्छतेचे महत्व सांगितले. स्वयं स्वच्छता व त्यासोबत परिसराची स्वच्छता तितकीच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगी बनवण्याचे आवाहन त्यांनी केले. आमचे घर, गल्ली, गाव, राज्य व देश आम्हाला स्वच्छ केलेच पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

 

शीतल नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि परदेशात लहान मुले देखील सार्वजनिक स्वच्छता पळताना दिसतात. आपल्याकडे मोठ्यांमध्येही स्वच्छतेच्या सवयी अभावाने दिसतात याबाद्दल खेद वाटतो. पणजी शहर स्वच्छ दिसण्यामागचे कारण स्वच्छता कर्मचारी आहेत. सर्व स्तरावर या स्वच्छता कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून देण्याची सवय नागरिकांना लावणे अवघड जात असल्याचे नाईक यांनी सांगितले. लोकांचे संपूर्ण सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतु प्रयत्न सुरु ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

गोव्यातील सामुदायिक खाद्य व पोषण आहार मंडळाच्या प्रमुख संगीता राणे यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच मंडळाच्या तांत्रिक सहकारी नीता राणे यांनी आभार मानले.