मुंबई : जीवन आधार फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा मुंबई गौरव पुरस्कार दैनिक सामनाचे मुख्य वार्ताहर रजनीश राणे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांना मुंबई भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
रवींद्र नाट्यमंदिर येथे रंगलेल्या शानदार सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. रंगभूमी, जाहिरात, सामाजिक, कार्य, सहकार आदी क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
गेली पंचवीस वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेले रजनीश राणे यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत यांना हा पुरस्कार देत असल्याचे आयोजक राजेश खाडे यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी-आपटे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.