साबांखा मंत्री ढवळीकरांवर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया

0
1104
गोवाखबर:सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना मुंबई मधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धि खात्याने पत्रकाद्वारे दिली आहे.
माहिती आणि प्रसिद्धि खात्याने सुदिन यांचे बंधू डॉ. संदीप माधव ढवळीकर यांचा हवाला देऊन प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात ढवळीकर यांची प्रकृती स्थीर असून त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरां मार्फत उपचार सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.सुदिन यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.सुदिन यांच्या प्रकृती बाबत चुकीच्या बातम्या पसरवू नका.गोमंतकीयांच्या आशीर्वादाने ढवळीकर लवकर बरे होऊन पुन्हा कामास लागतील असे डॉ. संदीप यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप आघाडी सरकार मधील आजारी मंत्री ही आता गंभीर बाब बनू लागली आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अमेरिकेत उपचार घेऊन गोव्यात परतले आहेत.पावसाळी अधिवेशन संपल्या नंतर पुढील उपचार करून घेण्यासाठी पर्रिकर ऑगस्ट मध्ये पुन्हा अमेरिकेस जाणार आहेत.विजमंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती अजुन सुधारलेली नाही.त्यांच्यावर अजुन देखील मुंबईत उपचार सुरु आहेत.नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही.अनेकदा उपचार करून घेण्यासाठी त्यांना विदेशात जावे लागते.आता पावसाळी अधिवेशन तोंडावर आले असताना ढवळीकर आजारी पडल्याने सरकार समोरिल चिंता आणखी वाढली आहे.19 जुलै पासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून ते 3 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.