साधना केल्याने व्यक्ती आदर्श बनते आणि आदर्श नेतृत्वच समाजात नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ असे सकारात्मक परिवर्तन घडवू शकते ! – चारुदत्त पिंगळे

0
939

वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत आध्यात्मिक नेतृत्व या विषयावर शोधनिबंध सादर

वाराणसी –  यथा राजा तथा प्रजा, या उक्तीचा अर्थ जसा राजा असतो, तशी प्रजा असते ! यानुसार वाईट नेत्यांमुळे समाजाची स्थितीही वाईट होते, तसेच चांगल्या नेत्यांमुळे समाजाचे कल्याण साधले जाऊन तेथे शांती नांदते. खरे नेतृत्व केवळ उच्च आध्यात्मिक पातळी प्राप्त केल्यानेच साध्य होऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी केले. १७.२.२०१८ या दिवशी येथील मोहनसराय स्थित स्कूल ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सायन्सेस येथे नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ परिवर्तनासाठी आवश्यक नेतृत्वाचे रसायन या विषयावरील सहावी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आध्यात्मिक नेतृत्व या विषयावर शोधनिबंध सादर करतांना ते बोलत होते. साधना केल्याने व्यक्ती आदर्श नागरिक बनते. यातील काही आदर्श नागरिक आध्यात्मिक उन्नती करून आदर्श नेते बनू शकतात आणि असे आदर्श नेते हेच समाजामध्ये नाविन्यपूर्ण आणि टिकाऊ असे सकारात्मक परिवर्तन घडवू शकतील, असा या शोधनिबंधाचा निष्कर्ष पिंगळे यांनी या वेळी मांडला.
आध्यात्मिक नेतृत्व या विषयावरील शोधनिबंधामध्ये आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या साहाय्याने अभ्यास करण्यात आला. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या व्यक्तीमधील नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा अन् त्याची प्रभावळ मोजणार्‍या उपकरणाद्वारे जगातील ४ प्रसिद्ध नेत्यांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यात आला. या नेत्यांमध्ये एक हुकूमशहा, एक प्रसिद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), एक राजकीय प्रमुख आणि एक उच्च आध्यात्मिक पातळी असलेले संत यांची निवड करण्यात आली. या यू.टी.एस्. यंत्राद्वारे घेण्यात आलेल्या चाचणीतील निरीक्षणांचे विश्‍लेषण केले असता लक्षात आले की, हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. हुकूमशहामधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात, हे आपण समजू शकतो; परंतु एका प्रख्यात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असणे आश्‍चर्यकारक होते. पुष्कळ सकारात्मकता प्रक्षेपित करणारे संत वगळता अन्य कोणा नेत्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही. प्रभावळीच्या (ऑराच्या) निरीक्षणातही संतांचीच प्रभावळ सर्वाधिक असल्याचे आढळले. यांसह सूक्ष्म स्पंदनांचा अभ्यास करणार्‍यांनाही या चारही नेत्यांमध्ये हुकूमशहा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांमध्ये नकारात्मकता, तर संतांच्या चित्रात मोठ्या प्रमाणात सकारात्मकता जाणवली.
हा शोधनिबंध महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक  डॉ. आठवले यांनी लिहला असून,  पिंगळे हे सहलेखक आहेत. या परिषदेचा प्रारंभ दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीदेवी पूजन करून करण्यात आला. या परिषदेत भारतासह विविध देशांतील तज्ञांनी अनेक शोधनिबंध सादर केले.