सागरी प्रदक्षिणेसाठी दिवाडी   येथे बांधून तयार केलेल्या ‘थुरिया’ या नौकेचे सोमवारी नारोवा-दिवाडी बेटावरील एक्वेरीअस शिपयार्डमध्ये  जलावतरण करण्यात आले. या  सोहळय़ाला बहुसंख्य दर्यावर्दी उपस्थित होते. नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी हे या नौकेतून एकटे जगाची सागरी प्रदक्षिणा करणार आहेत.‘थुरिया’ नौका ही 32 फुट लांब असून तिचे वजन 8 ते 9 टन आहे. ही नौका बांधण्यासाठी तीन कोटी खर्च आला आहे. म्हादई बोट बांधणाऱया रत्नाकर दांडेकर यांनीच या बोटीची बांधणी केली आहे. सर रॉबीन जॉन्स्टन यांच्या मुळ ‘सुहेली’ नौकेप्रमाणेच थुरीयाची रचना असून ती त्या नौकेची प्रतिमाच आहे. ही नौका बांधण्यासाठी लाकूड व फायबर ग्लासचा वापर करण्यात आला आहे. एक्वेरीअस शिपयार्डमध्ये बांधण्यात आलेली ही तिसरी नौका असून यापूर्वी आयएनएसवी म्हादई व आयएनएसवी तारीणी या नौका येथे बांधण्यात आल्या आहेत.