सागरी कृषी मेळाव्याचे 2 मार्च रोजी आयोजन

0
1479

गोवा खबर:भारतीय कृषी संशोधन परिषद- सागरी कृषी संशोधन संस्थेकडून 2 ते 4 मार्च 2019 दरम्यान सागरी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी कृषी संशोधन संस्था आणि सागरी कृषी संशोधन संघटना यांनी संयुक्त विद्यमाने या कृषी मेळाव्याचे आयोजन केले आहे. संस्थेचे संचालक डॉ ई. बी. चाकूरकर यांनी आज पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

सागरी कृषी मेळावा-2019 साठी गोवा, लक्षद्वीप बेटे आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ राज्यातील शेतकरी आणि विविध संस्थांचा सहभाग असणार आहे. या मेळाव्यात कृषी क्षेत्राशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान, वेगवेगळ्या पिकांच्या सुधारीत जाती, पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुट पालन, वराहपालन, या विषयावरील अद्ययावत माहिती आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यां थेट तज्ज्ञ आणि संशोधकांशी चर्चा करण्याची संधी या मेळाव्याच्या निमित्ताने मिळणार आहे.

2 मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता संस्थेच्या प्रांगणात मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे. सागरी कृषी मेळावा हा सर्वांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्याला भेट देण्याचे आवाहन संस्थेने केले.