सागरमाला प्रकल्पासारख्या विकास प्रकल्पांची आवश्यकता-नितीन गडकरी

0
964

गोवा:केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा संरक्षण खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आज सागरी संवाद परिषदेत व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या व्याख्यानात देशाच्या चौफेर विकासासाठी सागरमाला सारख्या प्रकल्पांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले. सागरी संवाद परिषद ही फोरम फॉर इन्टिग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी (फिन्स) या संस्थेने केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने या आंतरराष्ट्रीय परिषदेचे राज्यात आयोजन केले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी परिषदेचे अध्यक्ष ले.जन.(निवृत्त) डॉ शेकटकर, समन्वयक डॉ प्रभाकरन पलेरी यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.

 

नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात परवडण्याजोगे, प्रदूषण कमी करणारे, वस्तू आणि सेवांना पूरक असे प्रकल्प उभारण्यावर जोर दिला. सागरमाला प्रकल्प अशाच प्रकारचा असून यामुळे देशाच्या विकासात भर पडणार असल्याचे ते म्हणाले. बंदरांचा विकास करुन रेल्वेवाहतूक, रस्तेवाहतूक आणि जलवाहतूक यामुळे दळणवळणाची समस्या दूर होऊन वस्तू आणि सेवांची आदान-प्रदान करणे सोपे जाईल.

 

परिषदेत सहभागी श्रीलंकेतील प्रतिनिधींनी सागरमाला प्रकल्पाची व्याप्ती श्रीलंकेपर्यंत वाढवण्यीच मागणी केली. तर फोरम फॉर इन्टिग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी (फिन्स) या संस्थेने वेंगुर्ला (महाराष्ट्र) ते कारवार (कर्नाटक) हा भाग विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याची मागणी केली. असे केल्यास परिसरात रोजगाराच्या अमाप संधी निर्माण होतील, शिवाय दळणवळणासाठी रस्त्यांवरील ताण कमी होईल, असे आयोजक म्हणाले.

 

सागर या सागरी संवाद परिषदेत 22 देशांतील 32 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा यांच्या व्याख्यानाने शनिवारी परिषदेचा समारोप होणार आहे. परिषदेत चर्चा करण्यात आलेल्या मुद्यांचा मसुदा तयार करुन तो केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.