साखळीतील व्यापार्‍यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

0
293

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या बैठकीत साखळीतील स्थानिक व्यापार्‍यांनी आपल्या समस्यांसंबंधी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.

  बैठकीला साखळी भागातील स्थानिक व्यापारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी स्थानिक व्यापार्‍यांनी साखळीत बिगर गोमंतकीयांनी चालविलेल्या बेकायदेशीर व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी केली. साखळी नगरपालिकेला डावलून राजरोसपणे रस्त्याच्या बाजूला व्यवसाय करणार्‍यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी व्यापारी संघटनेतर्फे करण्यात आली. शिवाय काही बिगर गोमंतकीय व्यावसायिक आवश्यक सरकारी दाखल्याविना राजरोसपणे साखळीत व्यवसाय करत असल्याने कर स्वरूपात सरकारच्या तिजोरीत येणारा पैसा अन्य लोकांच्या खिशात जात असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीचे मामलतदार तथा साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. प्रविंजय पंडित यांना तातडीने त्यामध्ये लक्ष घालण्यास सांगितले व रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सांगितले.

 या बैठकीला साखळी व्यापारी संघटनेने साखळीत बेकायदा व्यवयासात गुंतलेल्यांची नावे मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून साखळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. प्रवींजय पंडित यांच्याकडे देण्यास सांगितले असून संलग्नित खात्यामार्फत अशा लोकांची शहानिशा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत.

साखळी बाजारपेठेत परवानगीशिवाय व्यवयास करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करत साखळी व्यापारी संघटनेतर्फे परराज्यातील व्यावसायिकांना ना हरकत दाखला देतेवेळी पोलीस क्लिअरन्स दाखला सक्तीचा करण्याची मागणी केली आहे. साखळीताल परराज्यातील व्यापार्‍यांकडे दुर्लक्ष होत असल्याने साखळीत गुन्हे वाढत असल्याची बाब व्यापार्‍यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी व्यापारी वर्गातर्फे साखळी कदंब बस स्थानकाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी केली व साखळीत एक मिनी थिएटरची सोय करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी साखळी कदंब बस स्थानकाचे काम लवकर पूर्ण करण्याची ग्वाही उपस्थितांना दिला.

व्यापारी वर्गातर्फे श्री. यशवंत देसाई, श्री. श्याम पेडणेकर, श्री. प्रियेश डांगी, श्री. सत्यवान काणेकर, श्री. अनिल काणेकर, श्री. विनय पांगम, नगरसेवक श्री. आनंद काणेकर, सौ. रश्मी देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी श्री. प्रवींजय पंडित यांनी पुढाकार घेऊन व्यापारी वर्गाच्या समस्या सोडवाव्यात असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.