सांतोण येथे रेल्वे रुळाची दरड कोसळली; रेल्वे सेवा विस्कळीत

0
1199
गोवा खबर:सतत सुरु असलेल्या मुसळधार  पावसामुळे दक्षिण गोव्यातील सावर्डेच्या सांतोण गावाजवळ रेल्वे रुळाची दरड कोसळल्याने मडगाव ते कुळे आणि त्यापुढे चेन्नई व दिल्ली येथे जाणाऱ्या गाड्या कुडचडे आणी मडगाव रेल्वे स्थानकावर अडकून पडल्या आहेत. 
ही घटना काल दुपारी घडली.  कुडचडे रेल्वे स्थानकापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर ही दरड कोसळली. जुन्या रेल्वे रुळाच्या जवळ समांतर रेल्वे रुळ घालण्याचे काम सुरू आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात चिऱ्याच्या आणि खडीच्या खाणी आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसाचे पाणी येथील खाणीत साचले होते. बुधवारी  पाण्याचा प्रवाह रेल्वे रुळाच्या दिशेने बदलल्याने रेल्वेच्या रुळाला लागून असलेली माती खचू लागली होती.
बुधवारी रात्री पाण्याचा जोर वाढल्याने सांतोण येथील गोवा स्पॉंज प्रकल्पाच्या मागील बाजूला असलेल्या रेल्वे रुळाची दरड कोसळली. ही घटना गुरुवारी पहाटे रेल्वे रूळ तपासण्याचे काम करणाऱ्या दक्षिण पश्चिम रेल्वेच्या लाईनमॅनना दिसून आल्यानंतर त्यांनी ताबडतोब कुडचडे रेल्वे स्थानक आणि हुबळी विभागाला या बाबतची माहिती दिली.