सांगेच्या पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर यांची बदली करा-शिवसेना

0
812
गोवा खबर: सांगे पोलिस स्थानकाच्या कोठडीत वाईट वागणूक दिली गेल्याची आणखी एक घटना उजेडात आल्याने त्या स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांची तातडीने बदली करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. कोठडीत होणारे हल्ले, मानहानी आणि छळणूक यात एकोस्कर  यांचा हात असण्याचे प्रकार चालूच आहेत,याबद्दल गोवा शिवसेनेच्या प्रवक्त्या राखी प्रभुदेसाई नाईक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
 नाईक म्हणाल्या, काही कारणावरून अटक करण्यात आलेल्या एका युवकाचे छायाचित्र सामाजिक माध्यमातून जाहीर झाले आहे. अटकेच्या कारवाईची औपचारिकता म्हणून त्या युवकाने नावाची पाटी धरलेले छायाचित्र माध्यमाकडे न जाता खरे तर केवळ पोलिसांच्या नोंदीतच असावयास हवे होते. सांगे पोलिस स्थानक व त्याचे  अधिकारी एकोस्कर यांच्या कार्यपद्धतीची चौकशी केली गेली पाहिजे. आपली गैरकृत्ये तशीच चालू ठेवता यावीत म्हणून  त्यांनी ठाण्यात सीसीटीव्ही लावू दिलेला नाही.
        याच सांगे पोलिस स्थानकात अमित नाईक यांच्यावर निर्दयी हल्ला करण्यात आला होता. जानू झोरे यांच्यावर तर स्वत: एकोस्कर यांनीच हल्ला केला होता, याचे राखी नाईक यांनी याप्रसंगी स्मरण करून दिले.
 त्या म्हणाल्या, अमित नाईक यांच्यावरील कोठडीतील हल्लाप्रकरणाची चौकशी पोलिस उप अधीक्षक सुनीता सावंत यांनी केली होती आणि त्यांनी कॉन्स्टेबल सोमेश फळदेसाईसह सगळ्या संशयित आरोपींना स्पष्टपणे दोषी ठरविले.
       फळदेसाईचे नाव प्रथमदर्शनी चौकशीत निष्पन्न होऊनही आणि प्राथमिक चौकशीत तो दोषी ठरविला जाऊनही अद्याप तो सांगे पोलिस ठाण्याच्या आधिपत्याखालील चौकीत काम करीत आहे, याकडे नाईक यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
 याचा सरळ सरळ अर्थ हाच की त्याला बडया राजकीय धेंडांचा पाठिंबा आहे. सांगे पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही लावा, अशी विनंती शिवसेनेने आठ महिन्यांपूर्वी पोलिस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना केली होती. सीसीटीव्ही लावायला जर पोलिसांकडे पैसा नसेल तर मी तो लावेन आणि पोलिसांतर्फे त्याची देखभालही करेन,असे नाईक म्हणाल्या.
       माजी आमदार सुभाष फळदेसाई आणि विद्यमन आमदार प्रसाद गावकर यांच्या या संबंधातील भूमिकांवरही शिवसेनेने या पत्रकार परिषदेत प्रश्नचिन्ह उभे केले. अटकेतील युवकाचे छायाचित्र जाहीर करण्यास माजी आमदारानेच सांगितले असल्याचा आरोप आहे, असे नाईक यांनी सांगितले.
       स्थानिक आमदार प्रसाद गावकर म्हणतात, की या मतदारसंघाच्या विकासासाठी मी प्रयत्न करीत आहे. जर या मतदारसंघात कायदा आणि सुव्यवस्थाच शिल्लक नसेल तर कोणत्या विकासाबद्दल ते बोलत आहेत, असा खोचक प्रश्न नाईक यांनी विचारला.
       अमित नाईक यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेबाबत बोलताना त्या महणाल्या, की एकोस्कर यांच्याकडून न्याय्य चौकशी होईल यावर विश्वास नसल्याने या प्रकरणी निष्पक्ष पोलिस ठाण्याद्वारेच चौकशी केली गेली पाहिजे.