सहित’ला प्रकाशक संघाचा पुरस्कार

0
1094
गोवा खबर:कोकणी आणि मराठी भाषेतून प्रयोगशील पुस्तक प्रकाशने करणार्‍या गोव्यातील सहित प्रकाशनच्या 2017 सालच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठाला प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्राप्त झाला. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणार्‍या या पुरस्कारांचे वितरण नुकतेच पुण्यामध्ये जाहीर कार्यक्रमामध्ये करण्यात आले. यावेळी मंचावर जेष्ठ प्रकाशक अप्पा परचुरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, ज्येष्ठ संपादक भानू काळे, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजेंद्र बर्वे, उपाध्यक्षा शशीकला उपाध्ये, कार्यवाह नितीन गोगटे यांची उपस्थिती होती.
’सहित 2017’ या भारताच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचा सांगोपांग विचार करणार्‍या एकमेव मराठी दिवाळी अंकाचे संपादन अजय कौटिकवार आणि किशोर अर्जुन यांनी केले असून, यामध्ये परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या विशेष चर्चात्मक लेखासह कुमार केतकर, गिरिश कुबेर, ज्ञानेश्वर मुळे, नितीन गोखले, अविनाश धर्माधिकारी, प्रकाश बाळ, सुधीर देवरे, निळू दामले, विजय नाईक आदींसह विविध अभ्यासकांनी भारताच्या बदलत्या राजकिय आणि परराष्ट्र धोरणांचा आढावा घेतला होता. अत्यंत वेगळ्या विषयावर अभ्यासपूर्ण दिवाळी अंक प्रसिध्द केल्याबद्दल ‘सहित’चे अभ्यासकांनी विशेष कौतुक केले.