सर्व हॉस्पिटलमधील खाटा भरल्या, कोविड रुग्णांचा जमिन, स्ट्रेचर्स व खुर्चीवर उपचार, आता मुख्यमंत्री सरण व कबरींची तयारी करतात का? : गिरीश चोडणकर

0
137
गोवा खबर : गोव्यात कोविडची परिस्थिती दिवसेंदिवस महाभयंकर होत चालली आहे. सर्व रुग्णालये त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना उपचार देत आहेत. खाटा उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर, स्ट्रेचर्सवर आणि खुर्च्यावर उपचार दिले जात आहेत. आताच ही परिस्थिती तर पुढे काय? गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरणांची व कबरींची तयारी करत आहे काय असा संतप्त प्रश्न गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी विचारला आहे.
राज्यात  आरोग्य क्षेत्रातील संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकमेकांवर राजकीय कुरघोडी काढण्यात व्यस्त आहेत. लोक त्रस्त असताना सरकार मात्र सुस्त आहे.  भाजप सरकारकडे परीस्थिती हाताळण्याची  कोणतीही योजना नाही. अशा स्थितीत उपचाराची सुविधा उपलब्ध नसताना केवळ प्राण गमावण्याचा एकमेव पर्याय रुग्णांकडे आहे असे गिरीश चोडणकर म्हणाले.
कोविडची दुसरी लाट येणार हे  माहित असूनही गेल्या एका वर्षात भाजप सरकारने खबरदारीची कोणतीच पाऊले उचलली नाहीत. कोविडचा संभाव्य धोका टाळण्यासाठी उपाय योजना असंवेदनशील भाजपा सरकारने हातात घेतल्या नाहीत. लोकांना चांगली आरोग्य सेवा द्यायला या सरकारला सपशेल अपयश आले आहे असे चोडणकर पुढे म्हणाले.
जीएमसी, दक्षिण आणि उत्तर गोवा जिल्हा इस्पितळे, ईएसआय आणि इतर सर्व रुग्णालये त्यांच्या  क्षमतेपेक्षा अधिक कार्यरत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. कॉंग्रेसच्या  कोविड नियंत्रण कक्षाला तर दर मिनिटास मदतीसाठी फोन येत आहेत. कोविड हाताळणी व व्यवस्थापन यासंबंधात जनतेला माहिती देण्यासाठी कोणतीही यंत्रणा सरकारकडे उपलब्ध नसल्याने  लोकांना मदत करण्यासाठी आम्ही संघर्ष करीत आहोत असे ते पुढे म्हणाले.
काल आरोग्यमंत्र्यांनी आपल्या  फेसबुक अकाउंटवरून येत्या दहा  दिवसांत गोव्यात २०० ते 3०० मृत्यू होतील असे जाहिर केले. नंतर त्यांनी हा पोस्ट काढून टाकला. आरोग्यमंत्र्यानी वास्तविकता मांडली होती की लोकांना घाबरवण्याकरिता सदर पोस्ट टाकला होता हे लोकांना कळणे गरजेचे आहे.  सदर पोस्ट काढुन टाकण्यासाठी मोदी-शाह यांचा इशारा आला  की गोव्याच्या सुपर  मुख्यमंत्र्यांनी तो काढण्याचा  आदेश दिला हे विश्वजीत राणे यांनी  स्पष्ट करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
ऑक्सिजन, उपचार व औषधे न मिळाल्यामुळे कोविड रुग्णांचे मृत्यू होत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या “दिया जलाव, थाली बजाव, ताली बजाव” या उत्सवाचे परिणती आता जळणारी सरणें व मेणबत्त्या पेटवलेल्या कबरींत झाली आहे असे ते पुढे म्हणाले.
राज्यात लोक कोविड संकटाचा सामना करत असताना, भाजप सरकार उत्सवी वातावरणात आहे व राजकीय लाभ घेण्यासाठी “टिका उत्सव” आयोजित करत आहे असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.