
गोवा खबर:देशातील सर्व विद्यापीठांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानासह विविध विषय आपापल्या भाषेत शिकवावेत असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. ते आज पुदुच्चेरी येथे विद्यार्थी आणि शिक्षकांना संबोधित करत होते. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेला चालना देण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणाच्या अभिनव पद्धती उपयोगात आणायला हव्यात,असे आवाहन करताना त्यांनी विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण संशोधनात सर्वोत्कृष्ट जागतिक केंद्र बनावं यावर भर दिला. शैक्षणिक संस्थांनी आपल्या कामकाजाचा आत्मपरिक्षण करावे आणि सुधारणा आवश्यक असलेली क्षेत्र शोधून काढावीत असे त्यांनी सांगितले. आपण उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करावी, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये 21 व्या शतकातील ज्ञान आणि कौशल्य असायला हवे तसेच त्यांच्यासाठी नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध असतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे असे ते म्हणाले.
विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करायला हवेत तसेच उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये रोजगारासाठी आवश्यक कौशल्य असायला हवे असेही ते म्हणाले.