सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येईपर्यंत पालिका निवडणूक प्रक्रिया चालू करणे चुकीचे : कॉंग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला निवेदन

0
234
गोवा खबर : राज्यातील पालिका निवडणूकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येइपर्यंत निवडणूक प्रकिया बंद ठेवावी अशा आशयाचे निवेदन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरिश चोडणकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे.
पाच नगरपालिकांच्या क्षेत्रातील आरक्षण उच्च न्यायालयाने रद्द केल्यावर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आरक्षण रद्द ठरवून दहा दिवसांत नव्या आरक्षणाची अधिसूचना जारी करावी असा आदेश पालिका प्रशासनाला दिला होता. मात्र या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणूक आयोगाने बंद केलेली प्रक्रिया पुन्हा सुरु केली होती.
गिरीश चोडणकर यांनी दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की एकदा निवडणूक प्रक्रिया सुरु झाली की ती बंद ठेवून परत सुरु करणे चुकीचे आहे. निवडणूक प्रक्रिया सतत चालू असते आणि जर ती बंद ठेवली तर ती रद्द करुन नव्याने प्रक्रिया सुरु करावी लागते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर १ मार्च ते सर्वोच्च न्यायालयाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या स्थगिती पर्यंत निवडणूक प्रक्रिया बंद होती. ” सर्वोच्च न्यायालयाने फक्त उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांना स्थगिती दिली आहे. बंद पडलेली प्रक्रिया परत सुरु करावी असा आदेश दिला नव्हता.” असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा सांगे पालिका पुरता सीमितआहे असे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
“या सर्व कायदेशीर बाजू बघितल्यास राज्य निवडणूक आयोग आधी जारी केलेल्या अधिसू्चने प्रमाणे निवडणूक प्रक्रिया पुढे नेउ नाही शकत. ही प्रक्रिया अशीच पुढे नेली तर ती इच्छुक उमेदवारांना नुकसान करणारी ठरेल. तसेच सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश न दिल्याने, ही प्रक्रिया सुरु करणे चुकीचे आहे.” असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेश हा सांगे पुरता असल्याने आणि त्यात इतर चार पालिकां बद्दल उल्लेख नसल्याने, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा येई पर्यंत राज्य निवडणूक आयोगाने गडबड करु नये असे चोडणकर यांनी म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने न्यायीक प्रक्रियेचा आदर करुन, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टता देई पर्यंत वाट बघावी असे त्यांनी पुढे म्हटले आहे.