सर्वसामांन्यांचा छळ करणाऱ्या सागर एकोसकरांना त्वरित निलंबित करा:शिवसेना

0
1455
गोवा खबर:आपल्या हिंसक,बेजबाबदार आणि बेकायदा वागण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या सांगेचे पोलिस निरीक्षक सागर एकोसकर यांना त्वरित निलंबित करा अशी मागणी शिवसेनेच्या उपाध्यक्ष तथा प्रवक्ता राखी नाईक यांनी आज केली.सांगे तालुक्यात धनगर समाजाच्या लोकप्रतिनिधीला पोलिस स्थानकात केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभुमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
पोलिस स्टेशन मध्ये जाणूनबुजून सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत असा आरोप करून नाईक म्हणाल्या, सांगे पोलिस स्टेशन सर्वसामान्य लोकांसाठी असुरक्षित बनले आहे.तेथील पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या गँगचे कारनामे प्रकाशात येऊ नये यासाठी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले नाहीत त्यामुळे सांगे पोलिस स्टेशन मध्ये न्याय मागण्यासाठी गेलेल्या लोकांच्या बाबतीत घडत असलेले भयंकर प्रकार कायद्याच्या रक्षकांना न शोभणारे असेच आहेत.
सांगे पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तथा पोलिस निरीक्षक एकोसकर यांचा उजवा हात असलेला सुदिन रेडकर एका ग्रामस्थाला लाथांनी मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर रेडकरची बदली केली गेली तरी बाकी टोळी अजुन सांगे पोलिस स्थानकात असल्याने गैरप्रकार थांबले नसल्याकडे नाईक यांनी लक्ष वेधले आहे.
सांगेचे आमदार प्रसाद गावकार या सगळ्या प्रकारांची माहिती असून देखील मुग गिळून गप्प बसले असल्या बद्दल नाईक यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
25 मार्च रोजी अमित नाईक यांच्या बाबतीत सांगे पोलिस स्थानकात पोलिस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या आशीर्वादाने काही स्थानिक लोकांनी अमित नाईक यांना कोठडीत केलेली मारहाण आणि खाजगी गाडी मधून केलेले अपहरण करण्यापर्यंत सांगे पोलिसांची मजल गेली असून कायद्याचे रक्षक सर्वसामान्य लोकांसाठी राक्षस बनू लागले असल्याची टिका नाईक यांनी केली.
सांगे पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षक एकोसकर यांच्या आशीर्वादाने बेकायदा कृत्य कसे होते याचा पर्दाफाश झाला असल्याचे सांगताना नाईक यांनी अमित नाईक अपहरण प्रकरणाचा दाखला दिला.पोलिस उपनिरीक्षक रेडकर हा अमित नाईक अपहरण प्रकरणात मुख्य संशयित होता मात्र त्यालाच एकोसकर यांनी त्या घटनेचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते याकडे लक्ष वेधले.
वाडेचे पंच सदस्य जानू झोरे यांना एकोसकर यांनी पोलिस स्थानकात केलेल्या मारहाणीचा नाईक यांनी तीव्र शब्दात निषेध केला.एकोसकर यांनी आपल्या भावा सोबत पोलिस स्थानकात गेलेल्या झोरे यांना बेदम मारहाण तर केलीच आणि त्यांच्या मोबाइलची देखील मोडतोड केल्याचा आरोप होत आहे.
झोरे यांना मारहाण करणाऱ्या एकोसकर यांची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी करत नाईक म्हणाल्या,या प्रकरणात झोरे यांच्या सोबत असलेल्या लोकांची साक्ष महत्वपूर्ण ठरणार आहे.झोरे यांना कलम 151 अंतर्गत करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक अटके बद्दल नाईक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
एकोसकर यांच्या गुंडगीरीचा ज्याना फटाका बसला आहे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगून नाईक म्हणाल्या, नुंदे-नेत्रावळी येथील लक्ष्मण गावकार यांच्या बाबतीत देखील एकोसकरने अन्याय केला आहे.एका वाहनाने ठोकरून पलायन केल्याने गावकर यांचे दोन्ही पाय आणि हात मोडले होते मात्र सांगे पोलिसांनी त्यांची फिर्याद लिहून घेण्यास नकार दिला होता याची आठवण नाईक यांनी यावेळी करुन दिली.
एकोसकर यांना लोकांना कायदा हातात घेऊन मारण्याचे अधिकार कोणी दिले असा प्रश्न उपस्थित करत नाईक यांनी एकोसकर यांच्या विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याचिका दाखल करून एकोसकर यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचे नाईक यांनी शेवटी सांगितले.