सरदेसाईंपुढे मुख्यमंत्र्यांचे म्याव:चोडणकर

0
1508
गोवा खबर:मुख्यमंत्र्यांचा उल्लेख वाघ म्हणून केला जात असला तरी  गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंपुढे ते म्याव सुद्धा करू शकत नाहीत अशी बोचरी टिका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज फॉर्मेलिनयुक्त मासळी वरुन मुख्यमंत्री आणि सरदेसाई यांच्यावर जोरदार तोफ डागली.
हैदराबाद येथील प्रशिक्षण संपवून गोव्यात दाखल होताच चोडणकर यांनी भाजप आघाडी सरकारवर फॉर्मेलिन विषयावरुन जोरदार हल्लाबोल केला.
चोडणकर म्हणाले,मुख्यमंत्र्यांचा कॅबीनेट वरील कंट्रोल पूर्णपणे सुटला आहे.मंत्री एकमेकांवर जाहिरपणे आरोप करू लागले आहेत.एकमेकांची कामे करण्यासाठी मंत्र्यांना देखील पैसे मोजावे लागत असून इतक्या वरच्या पातळीपर्यंत भ्रष्टाचार पोचला आहे.
मुख्यमंत्री फक्त खुर्ची टिकवण्यात धन्यता मानत असल्याचे सांगून चोडणकर म्हणाले,मासळी हा गोयकारपणाचा मुख्य घटक आहे.तरी देखील फॉर्मेलिन माफीयांना पाठीशी घालण्यासाठी एफडीएच्या रिपोर्ट मध्ये फेरफार करून लाखो गोमंतकीयांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार झाला हे कसेच समर्थनीय ठरणार नाही.बाहेरिल राज्यातून आयात केल्या जाणाऱ्या फॉर्मेलिन युक्त मासळीवर बंदी घालायला मुख्यमंत्र्यांना 12 दिवस का लागतात.त्यांनी केलेली दिरंगाई संशयास्पद अशीच आहे.त्यातून त्यांना लोकांच्या आरोग्याशी काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
गोव्यात आयात केलेल्या माशांवर कायमची बंदी घाला अशी मागणी करताना चोडणकर यांनी फक्त गोव्यात खाल्ली जात नाही तेवढी मासळी निर्यात करून बाकी मासळी गोव्यात वापरली तरी गोव्याची गरज पूर्ण होऊ शकते असे मत व्यक्त केले.
गोवा फॉरवर्ड सोबत युती केली नाही हे बरेच झाले असे सांगत चोडणकर यांनी विजय सरदेसाई यांचा चांगलाच समाचार घेतला.सरदेसाई यांच्याशी युती करून भाजपची जी अवस्था झाली आहे ती पाहता आमची युती झाली नाही ते एका अर्थाने बरेच झाले असे खोचक मत चोडणकर यांनी व्यक्त केले. सरदेसाई यांच्या सोबत काँग्रेसची युती झाली असती तर काँग्रेसची अवस्था बिकट झाली असती.त्यावेळी आमच्या नेत्यांनी जो निर्णय घेतला तो योग्यच होता हे आता दिसून येत असल्याचे चोडणकर म्हणाले.
सरदेसाई हे डिस्ट्रॉयर असल्याची टिका करत चोडणकर यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली.कोणत्याही परिस्थिती मध्ये भविष्यात देखील काँग्रेस सरदेसाई यांच्या सोबत युती करून  आपली वाट लावून घेणार नाही असे चोडणकर यांनी स्पष्ट केले.
एफडीएच्या संचालिका सरदेसाई यांचे फोन डिटेल्स तपासले तर त्यांच्यावर कोण कोणत्या राजकारण्यानी दबाव टाकला होता हे कळून येईल अशी मागणी करताना उद्या देखील काँग्रेस आमदार विधानसभेत फॉर्मेलिनचा विषय लावून धरतील आणि गोमंतकीयांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उघडे पाडतील असा इशारा चोडणकर यांनी यावेळी दिला.