सरकारी कार्यक्रमात पास्टिक वेष्टनातील पुष्पगुच्छ देणे यापुढे पडणार महागात

0
986

गोवा:सरकारी कार्यालयातील कार्यक्रमावेळी पास्टिकच्या वेष्टना मधील पुष्गुच्छ देऊन कोणी पाहूण्याचे स्वागत केले तर संबंधित खात्याला ते महागात पडण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे. सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये. फक्त एक फुल द्यावे. वारंवार सरकारने परिपत्रके जारी करून सरकारी कार्यालयांना बजावले आहे. मात्र त्या सूचनेचा पालन होत नाही. यापुढेही जर पुष्पगुच्छच सरकारी कार्यालयांनी दिले तर मात्र संबंधितांना शिक्षा करावी लागेल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी दिला आहे.
पणजीतील कला अकादमीत तीन दिवसीय पर्यावरणविषयक चित्रपट महोत्सवाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम सरकारी नव्हता पण मुख्यमंत्र्यांना आयोजकानी मोठा पुष्पगुच्छ दिला व स्वागत केले.त्यानंतर बोलताना पर्रिकर यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर आपण गंभीर असल्याचे संकेत दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की निदान पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी फुले वाया घालवू नयेत किंवा कचर्‍याची निर्मिती करू नये. फक्त शब्दांनीच स्वागत केले तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. पुष्पगुच्छाला अनेकदा छोटे प्लास्टिकही लावले जाते. सरकारी कार्यालयेही वारंवार पुष्पगुच्छांचाच वापर करतात. हे पर्यावरणास पुरक नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पर्रीकर म्हणाले, यापुढे जर सरकारी कार्यालयांनी पुष्पगुच्छ दिले तर शिक्षाच दिली जाईल. प्लास्टिकच्या बॅगांचा वापर पूर्णपणे थांबावण्याची गरज आहे. गोवा सरकार यापुढे सरकारी कार्यक्रमांना प्लास्टिकचा वापर करणार नाही. सरकारी राजपत्रही यापुढे इलेक्ट्रोनिक रूपात दिले जाईल. कागदी रुपात राजपत्र उपलब्ध करून देणे हळूहळू बंदच केले जाईल.