सरकारमध्ये स्थान नसल्याने मगो पदाधिकारी अस्वस्थ

0
1079
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकु निकाल दिल्यानंतर ज्या भाजप विरोधात मगो पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या त्याच भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी होण्याचा निर्णय मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी घेतला.मगोतर्फे सुदिन ढवळीकर आणि बाबू आजगावकर मंत्री बनले तर दीपक पावसकर यांच्याकडे महामंडळ सोपवण्यात आले.याव्यतिरिक्त मगोच्या पदाधिकाऱ्यांना सरकार मध्ये कोणतेच प्रतिनिधित्व न मिळाल्याने मगो पदाधिकारी अस्वस्थ बनले आहेत.
मगो एवढेच आमदार विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्डचे निवडून आले असले तरी आज सरकार मध्ये त्यांचे 3 कॅबिनेट मंत्री असून त्यांचे अनेक पदाधिकारी सरकारी संस्थाचे पदाधिकारी आणि प्रमुख बनले आहेत.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर देखील गोयंकारपणाची भाषा सर्रास बोलताना दिसत आहेत.गोवा फॉरवर्डचा सरकारवर पूर्णपणे वचक असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.गोवा फॉरवर्डने आपण दिलेली सगळी आश्वासने सरकार कडून पूर्ण करून घेतली आहेत.
मगोच्या गोटात मात्र शांतता आहे.सुदिन ढवळीकर हे बांधकाम आणि वाहतूक सारखी अर्थपूर्ण आणि आवडती खाती मिळाल्यानंतर आणखी आपल्याला काही नको अशा अविर्भावात शांत असल्याने पदाधिकारी धुसफुस करू लागले आहेत.ढवळीकर यांनी सरदेसाई यांच्या प्रमाणे आक्रमक भूमिका घेतली असती तर मगोच्या पदाधिकाऱ्यांना सरकार मध्ये प्रतिनिधित्व मिळू शकले असते मात्र ढवळीकर यांनी त्यात रस न घेतल्याने मगो पदाधिकारी बेदखल झाले असल्याची भावना कार्यकर्त्यांची बनली आहे.भाऊसाहेब बांदोडकर ज्या उद्देशाने मगोची निर्मिति केली होती त्याला तिलांजली देत मगो ही फक्त ढवळीकरवादी पार्टी बनली असल्याची खंत मगोच्या जेष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवली. यापार्श्वभूमीवर मगोच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेचा भाग बनवून त्यांचे हात पुढे तरी बळकट केले जाणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.