सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध करावे : चोडणकर

0
1078

गोवा खबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने विधानसभा अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करून दाखवावे. कारण भाजपचे संख्याबळ फक्त 10 आहेत.तसेच काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत आणि ते एकसंध आहेत. उगाच आमदार फुटण्याच्या अफवा भाजपकडून पिकवल्या जात असून गोव्यातील ही राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आता राज्यपालांनी जबाबदारीने वागून लोकशाही व घटनात्मक पद्धतीने निर्णय घ्यावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले आहे.

पर्रीकर सरकार सध्या अल्पमतात असून भाजपने त्यांच्या 14 आमदारांची परेड करून दाखवावी. अशा या अल्पमतातील सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. बहुमतासाठी भाजप आता घोडेबाजार करू लागला असल्याचा आरोपही चोडणकर यानी केला आहे. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे तीन मंत्री आजारी असल्याने हॉस्पिटलात उपचार घेत असून त्याच पक्षाचा सभापती असल्याने भाजप संख्याबळ 14 वरून 10 वर आले असल्याचा दावा चोडणकर यांनी केला आहे.

सरकारमधील मित्रपक्षांनी पर्रीकर यांना पाठिंबा दिलेला आहे, भाजपला नव्हे. तसे त्या पक्षांनी वारंवार सांगितले आहे. पर्रीकर यांचा उत्तराधिकारी भाजपकडे नसल्यामुळे आणि दुसऱया आमदारास किंवा नेत्यांस मुख्यमंत्री म्हणून त्यांचे मित्रपक्ष पाठिंबा देणार नसल्याने राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. पर्रीकर जेव्हा मुख्यमंत्रीपद सोडतील, तेव्हाच त्यांचे सरकार कोसळेल हे स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले.

पर्रीकर सरकार अल्पमतात असल्यामुळे राज्यपालांनी ते बडतर्फ करावे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी पाचारण करावे. काँग्रेस पक्ष बहुमत सिद्ध करेल. विद्यमान राजकीय अस्थिरतेमुळे सध्याच्या पर्रीकर सरकारने अल्पमतात असल्याने सत्तेवर राहू नये. अशा अल्पमतांतील सरकारला सत्तेवर कायम केले तर तो चुकीचा पायंडा पडेल आणि लोकशाहीला अर्थच उरणार नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत आणि ते एकसंध आहेत. उगाच आमदार फुटण्याच्या अफवा भाजपकडून पिकवल्या जात असून गोव्यातील ही राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आता राज्यपालांनी जबाबदारीने वागून लोकशाही व घटनात्मक पद्धतीने निर्णय घ्यावा, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.

राज्यात कुणाचेही सरकार असो, ते स्थिर असले पाहिजे: कामत

राज्यात कुणाचेही सरकार असो, ते स्थिर असले पाहिजे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती ठिक नसल्याने आज अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. कारण, ज्या प्रकारे सरकार चालायला पाहिजे, त्या पद्धतीने ते चालत नाही. याचा परिणाम सरकारात असलेल्या मंत्र्यांवर तसेच आमदारांवर होत असतो असे विधान आमदार दिगंबर कामत यांनी माध्यमांशी बोलताना केले.