सरकारने पोलिस दादागीरी चालु ठेवल्यास संपुर्ण गोवा शेळ-मेळावलीत जमेल : दिगंबर कामत

0
432
गोवा खबर : शेळ-मेळावलीतील आपल्या शेतीयोग्य जमिनीचे रक्षण करण्यासाठी भाजप सरकारने लादलेल्या आयआयटी प्रकल्पास विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांकडुन लाठीमार व अश्रुधूराचा वापर करणारी भाजप सरकारच्या धक्कादायक कृतीचा मी तीव्र निषेध करतो. सरकारने पोलिसांची दादागीरी चालुच ठेवल्यास संपुर्ण गोवा शेळ-मेळावलीत जमेल असा इशारा विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी दिला आहे.
शेळ मेळावलीतील आयआयटीला विरोध करण्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या वृद्ध महिलांवर पोलीसांनी केलेला लाठीमार दुर्देवी आहे. सरकार कोणताही प्रकल्प जनतेच्या इच्छे विरुद्ध लोकांवर लादु शकत नाही असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
शेळ मेळावलीतील रहिवासी आपली शेतीयोग्य जमिनीचे व घरांचे रक्षण करण्यासाठी लढा देत आहेत. सरकारकडे आज आयआयटीसाठी इतर पडिक  जागा उपलब्द असुन, सरकारने आयआयटी प्रकल्प तेथे हलविणे गरजेचे आहे. लोक भावनांचा आदर करणे प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे असे सांगुन, जबाबदार सरकारे लोकांच्या हिताचे रक्षण करुन योग्य निर्णय घेतात असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस सरकारच्या काळात अनेक आंदोलने झाली व लोकांच्या मागणीला मान देवुन आम्ही प्रादेशीक आराखडा, सेझ रद्द केले याची आठवण करुन देत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी  हुकूमशाही वृत्ती सोडुन जनतेचे म्हणणे ऐकणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
सरकारने ताबडतोब पोलिस बळाचा वापर करणे थांबवावे व शहाणपणा दाखवुन आपला निर्णय बदलावा. सरकारने हेकेखोरपणा न सोडल्यास संपुर्ण गोवा पेटून उठेल व लोकांना आवरणे सरकारला कठिण होणार हे मुख्यमंत्र्यानी ध्यानात ठेवावे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.