सरकारने गोमंतकीय तज्ञांचा सल्ला घेऊन आरोग्य क्षेत्राचा कृती आराखडा तयार करावा : दिगंबर कामत

0
425
गोवा खबर: मडगावचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करणे आजच्या घडीला अत्यंत महत्वाचे आहे. सामान्य लोकांना योग्य वैद्यकिय सुविधा पुरवण्याच्या ध्येयाने हा इस्पितळ प्रकल्प हाती घेण्यात आला होता व सदर ध्येयापासुन वेगळा विचार करण्यास आपण कदापी देणार नाही असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी म्हटले आहे.
सरकार आज सदर भव्य इस्पितळातील दोन मजले रिकामे ठेवुन कोविड रुग्णांची सोय करण्यासाठी गोव्यातील खासगी इस्पितळातील आयसियुत २० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याचा आदेश देते यावरुन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असल्याचे  कामत म्हणाले.
 दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ प्रकल्प पुर्णपणे कार्यांवित झाल्यास उत्तम आरोग्यसेवा देण्यास उपयुक्त ठरेल असे ते पुढे म्हणाले.
सरकारने पीएम केअर फंडातुन निधी मागवावा व जिल्हा इस्पितळाचे उर्वरीत काम पुर्ण करुन लोकांना आरोग्य सेवा देण्यास सुरूवात करावी अशी मागणी  कामत यानी केली आहे. कोरोना बाधित तसेच कोविड रुग्णाना हाताळण्यात सरकारला त्यामुळे सोयीचे होणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारने गोवा वैद्यकिय महाविद्यालय प्रकल्पात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी सुरू केलेल्या कार्डिॲक केअर युनिटचे उदाहरण समोर ठेवणे गरजेचे आहे. सदर विभाग आज ह्रदय रोगावर उत्तम उपचार पद्धत राबवीत असल्याचे सांगुन, आज गोमंतकीय डाॅक्टर तेथे सेवा बजावत असल्याचे  कामत यानी म्हटले आहे.
सरकारने वैद्यकिय क्षेत्रातील गोमंतकीय तज्ञांचा सल्ला घेऊन गोव्यात मुलभूत व प्रगत वैद्यकिय सेवा पुरविण्यासाठी कृति आराखडा तयार करावा. गोव्यातील प्रत्येक भागधारकाचे मत जाणुन घेणे महत्वाचे आहे असे  कामत म्हणाले.
आज कोविड हाताळणीत कमतरता असल्याने व योग्य सुविधांचा अभाव असल्याने रुग्ण व लोकांना त्रास व मनस्ताप सहन करत रहावा लागत आहे. कोविडची लागण झालेल्या रुग्णाना कोविड केअर सेंटर मध्ये जागा नसल्याचे सांगुन, त्याना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने सदर रुग्णांचे कुटूंबिय व परिसरातील लोक यांच्यात भितीचे वातावरण आहे,याकडे कामत यांनी लक्ष वेधले.
सरकारने परिस्थीती हाताबाहेर जाण्यापुर्वी ताबडतोब कोविडवर कृती आराखडा व श्वेतपत्रिका जारी करणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने प्रतिसाद न दिल्यास मला वेगळा मार्ग निवडावा लागेल,असा इशारा कामत यांनी दिला आहे.