सभापती पदासाठी भाजपतर्फे पाटणेकर तर काँग्रेसतर्फे राणे

0
1401

 

गोवा खबर:गोवा  विधानसभेच्या सभापती पदासाठी  ‘एनडीए’तर्फेभाजपचे डिचोलीचे आमदार  राजेश पाटणेकर तर काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी आपले अर्ज आज दुपारी  विधानसभा सचिवांच्‍यासमोर  सादर केले.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधना नंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी तत्कालीन सभापती असलेल्या प्रमोद सावंत यांची निवड झाली होती.त्यामुळे सभापती पद रिक्त झाले होते.दरम्यानच्या काळात उपसभापती मायकल लोबो यांनी हंगामी सभापती म्हणून काम पाहिले होते.आपण सभापती पडासाठी इच्छुक नसल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले होते.त्यामुळे इतर नावांवर भाजपला विचार करावा लागला होता.
भाजप गाभा समितीच्या आज सकाळी झालेल्या बैठकीत सभापतीच्या नावाविषयी चर्चा करण्यात आली. सभापतीसाठी राजेश पाटणेकर यांच्या सोबत शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर आणि मयेचे आमदार प्रवीण झांट्ये अशी तीन नावे सूचवण्यात आली होती. यातील पाटणेकर यांच्या नावाला समितीने एकमताने पसंती दिली.
भाजप आघाडीकडे भाजपचे 17,3 गोवा फॉरवर्ड पक्ष आणि 3 अपक्ष मिळून 23 चे संख्याबळ  असल्याने उद्या पाटणेकर निवडून येतील हे जवळ जवळ निश्चित आहे.तरी देखील काँग्रेसने माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
पाटणेकर हे 55 वर्षीय असून ते 2002-07 , 2007- 12 आणि 2017 सालच्या विधानसभा निवडणूकीत डिचोली मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी खादी ग्रामोध्योग मंडळाचे अध्यक्ष, सार्वजनिक लेखा समितचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून ते सध्या गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
विधानसभा सभापती निवडीसाठी राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी उद्या एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.त्यात सभापतींची निवड होणार आहे.
पाटणेकर उमेदवारी अर्ज सादर करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गोवा फॉरवर्डचे नेते कृषि मंत्री विजय सरदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर अर्ज दाखल करताना उपस्‍थित होते.
काँग्रेस तर्फे राणे अर्ज सादर करताना विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांच्यासह सर्व आमदार यावेळी उपस्थित होते.राणे हे विधानसभेतील ज्येष्ठ आमदार असून त्यांनी सभापती पद देखील अनेक वर्षे सांभाळले आहे.त्यामुळे त्यांची सभापतीपदी निवड करावी,असे आवाहन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केले आहे.