सनबर्न क्लासिक ईडीएम आयोजनाला अखेर सरकारची मान्यता;हिंदू जनजागृतीचा विरोध कायम

0
1095
गोवा खबर:उत्तर गोव्यातील वागातोर किनार्‍यावर ‘सनबर्न क्‍लासिक’ महोत्सव  23 व 24 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी दिली.
राज्यात  तीन वर्षानंतर ‘इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक’ (ईडीएम) महोत्सव आयोजित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासंदर्भात बोलताना आजगावकर म्हणाले,  ‘सनबर्न क्‍लासिक’ महोत्सवाला पर्यटन खात्याने याआधीच तत्त्वत: मान्यता दिली होती. राज्यस्तरीय पर्यटन समितीनेही पर्यटनाच्या द‍ृष्टीने   ‘ईडीएम’ राज्यात आयोजित होणे  गरजेचे असल्याचे मत व्यक्‍त केले होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनीही या कार्यक्रमाला  बुधवारी अंतिम मान्यता दिली आहे.
हिंदू जनजागृती समितीने सनबर्न आयोजन करण्यास मान्यता देऊ नये अशी मागणी करत पणजीत निदर्शने केली होती.आज पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सनबर्न ईडीएम रद्द करावा,अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने लावून धरली असली तरी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करत सनर्बन क्लासिकला मान्यता दिली आहे.
आजगावकर म्हणाले,  पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने गोमंतकीयांनीही राज्यात ‘ईडीएम’ आयोजित होणे आवश्यक वाटतेे.  ‘पर्सेप्ट कंपनी’च्या मालकीच्या असलेल्या  ‘सनबर्न’ ने स्थानिक ‘क्‍लासिक’ यांच्यासोबत  संयुक्‍तरित्या ‘सनबर्न क्‍लासिक’ या नावाने ‘ईडीएम’ आयोजित करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती.
सनबर्नने 2011 ते 2015 या कालावधीत सरकारच्या विविध खात्याला देणे असलेली थकबाकी फेडल्यानंतरच नव्याने आयोजन करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती  ट्रोजन डिमेलो यांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयाकडे  केली आहे. या महोत्सवासाठी पुरेशी बँक गॅरंटी आयोजकांकडून वसूल करावी, असे  प्राधिकारणाला आदेश देण्याची डिमेलो यांनी मागणी केली आहे. या याचिकेवर बुधवारी झालेल्या सुनावणीत,  सरकार आणि आयोजक या दोन्ही प्रतिवादींना येत्या शुक्रवारपर्यंत (22) प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यापुढील सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देश संकटात असल्याने ‘सनबर्न क्लासिक’ला दिलेली मान्यता रहित करा !हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
पुलवामा (काश्मीर) येथे १४ फेब्रुवारीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४४ पोलीस हुतात्मा झाले. या आक्रमणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्‍वभूमी लाभलेला आणि महसूलबुडव्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे. ‘सनबर्न’ने बुडवलेला कर सव्याज त्वरित वसूल करावा आणि राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ आयोजकांवर ध्वजसंहितेनुसार गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे २१ फेब्रुवारी या दिवशी एका निवेदनाद्वारे केली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सर्वश्री सत्यविजय नाईक, गोपाळ बंदीवाड आणि देविदास गावकर यांची उपस्थिती होती.
    या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वागातोर येथे २३ आणि २४ फेब्रुवारीला ‘सनबर्न क्लासिक’ महोत्सव होत आहे. वस्तूत: ‘सनबर्न’ची पार्श्‍वभूमीच वादग्रस्त आहे. ‘सनबर्न’मध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, हा पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांचा अनुभव आहे. ‘सनबर्न’ने गोवा शासनाचा कोट्यवधी रुपये कर बुडवला असल्यानेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने त्याच्या आयोजनास मनाई केली आहे. त्यामुळे ‘सनबर्न’चे आयोजन गेली ३ वर्षे पुणे येथे झाले आणि तेथेही या महोत्सवाची पार्श्‍वभूमी कायदाद्रोही ठरली आहे. पुलवामा आतंकवादी आक्रमणानंतर देशभरात क्रोधाची भावना असतांना युवकांना व्यसनाधीन बनवणार्‍या सनबर्नसारख्या पार्ट्यांचे आयोजन करणे अयोग्य आहे. देश संकटात असतांना देशातील युवकांना राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम शिकवण्याची आज आवश्यकता आहे.