
भारतीय प्रशासकीय सेवेत प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली
गोवा खबर:मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या, राज्यांच्या प्रशासकीय सेवेतून भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांच्या 120 व्या तुकडीने आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली.
देशाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या विकासात अखिल भारतीय सेवांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची असल्याचे, राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. राष्ट्र उभारणीच्या कामी या सेवांचे योगदान मोलाचे आहे. मात्र त्याचवेळी अधिकाऱ्यांनी सेवेत सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी सूचना राष्ट्रपतींनी केली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या व्यावसायिक आचरणातून प्रामाणिकपणा, मानवता आणि संवेदनशीलतेतून समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
राष्ट्रपतींनी अशी अपेक्षा व्यक्त केली की, अधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी काम करावे. काही लोकांना इतरांपेक्षा सरकारी मदतीची जास्त गरज असते. सनदी अधिकाऱ्यांनी त्यांचे लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित घटकांकडे वळवावे. अशा घटकांना त्यांच्या मदतीची जास्त गरज असते.