सत्य आणि भाजपची सांगड शक्य नसल्याने राज्यपालांची बदली:विरोधी पक्षनेते कामत

0
1085
गोवा खबर : सत्याचे पालक गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोमंतकीयांच्या भावना व अस्मितेचा आदर करत म्हादई, अर्थव्यवस्था व खर्च कपात, कोविड हाताळणी या विषयांवर गोमंतकीयांचे हित जपले. सत्य व भाजप यांची सांगड बसु शकत नाही व त्यामुळेच राज्यपालांचा बदली आदेश निघाला अशी टीका विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. 
गोवा व गोमंतकीयांना त्यांच्या मार्गदर्शनाची  जेव्हा अत्यंत गरज होती त्याचवेळी त्यांची बदली होणे हे खरेच दु:खदायी आहे. त्यांनी नेहमीच गोव्याच्या भल्यासाठी निर्णय घेतले व सामान्य माणसांचा आदर करणे व पर्यावरण व निसर्गाची  राखण करणे अशी त्यांची नेहमीच भावना होती. राज्याच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थे बद्दल त्यांना नेहमीच चिंता होती व ते खर्चकपात करा व वायफळ खर्च बंद करा असा सरकारला नेहमी सल्ला देत होते,याकडे कामत यांनी लक्ष वेधले आहे.
कामत म्हणाले,गोमंतकीयांच्या ह्रदयात त्यांनी स्थान निर्माण केले आहे. गोवा त्यांना नेहमीच अभिमानाने व आदराने पाहणार आहे. त्यांच्या बदलीच्या आदेशाने प्रत्येक गोमंतकीयाला धक्काच बसला आहे.
कामत यांनी राज्यपाल मलिक यांना उत्तम आरोग्य, आनंद व आयुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या.