संसदेतील खाण-उद्योग कायद्याच्या दुरुस्तीला शिवसेनेचे खासदार पाठिंबा देणार:शिवसेना 

0
2689
गोवा खबर:गोव्यातील खाण-उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी संसदेत मांडण्यात येणाऱ्या कोणत्याही दुरुस्ती विधेयकाला संसदेतील शिवसेनेचे सर्व खासदार पाठिंबा देतील, याचा शिवसेनेने पुनरुच्चार केला आहे. असा पाठिंबा देण्याचे आश्वासन शिवसेनेने यापूर्वी दिले होते.
 गोव्यातील खाण-उद्योग बंद पडल्याने किमान ३ लाख लोक अडचणीत आले आहेत. शिवसेना अशा आपदग्रस्तांच्या नेहमीच पाठिशी उभी राहिली असल्याचे सांगून शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी नाईक म्हणाल्या,‘गोवा खाण-उद्योग लोकआघाडी’ने यापूर्वी केलेल्या आंदोलनाच्या वेळी संसदेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी खाणपीडितांची भेट घेतली होती. या प्रश्नावर गरज भासल्यास संसदेचे कामकाज रोखून धरण्याचे आश्वासनही त्यांनी त्यावेळी दिले होते. खाण-उद्योग पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने खाणींसंबंधीच्या सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमधे कोणतीही दुरुस्ती केल्यास संसदेतील शिवसेनेचे सगळे सदस्य तिला ठामपणे पाठिंबा देतील,याबद्दल गोव्यातील खाणग्रस्तांनी निश्चिंत रहावे.
 नाईक म्हणाल्या, बेरोजगारीमुळे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या उदरनिर्वाहाच्या समस्येने त्रस्त झालेल्या लोकांचे दु:ख शिवसेना समजू शकते. संसदेच्या आगामी अधिवेशनात यासंबंधीचे दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या भाजपने दिलेल्या शब्दाला ते जागतील, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे.
 खाण-उद्योगावर अवलंबून असणाऱ्यांची दैन्यावस्था गोवा शिवसेना शाखेतर्फे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला सतत कळविली जाते,असे सांगून नाईक म्हणाल्या, खाणी पूर्ववत सुरू होण्यासाठी जे काही करता येईल ते सगळे केले जाईल, असे आश्वासन शिवसेनेच्या केंद्रीय नेत्यांनी दिले आहे.