गोवा खबर:संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलैला सुरु होणार असून 10 ऑगस्टपर्यंत ते चालेल. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली. गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कामकाजावरील मंत्रीमंडळ समितीची बैठक झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

संसदेचे पावसाळी अधिवेशन फलदायी व्हावे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन अनंतकुमार यांनी केले.

घटना (123 वी सुधारणा) विधेयक 2017, मुस्लिम महिला (विवाहांवरील हक्कांचे संरक्षण) विधेयक 2016, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक 2017, मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचा हक्क ( दुसरी सुधारणा) विधेयक 2017 ही महत्वाची विधेयकं संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यसभेचे विद्यमान उपाध्यक्ष पी.जे.कुरिअन यांचा कार्यकाळ संपत असल्याने या सत्रात राज्यसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूकही होईल, असे अनंतकुमार यांनी सांगितले.