संरक्षण प्रदर्शनाचे पंतप्रधानांच्या हस्ते लखनौमध्ये उद्‌घाटन

0
1340
The Prime Minister, Shri Narendra Modi visiting the Pavilions of the 11th edition of DefExpo, at Lucknow, in Uttar Pradesh on February 05, 2020.

 

भारत केवळ बाजारपेठ नव्हे तर संपूर्ण जगासाठी अमाप संधीचे दालन – पंतप्रधान

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथे 11व्या संरक्षण प्रदर्शनाचे उद्‌घाटन केले. जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून भारताच्या क्षमतेचे दर्शन या द्वैवार्षिक संरक्षण प्रदर्शनातून घडते. संरक्षण प्रदर्शन 2020 भारताचा सर्वात मोठा संरक्षण प्रदर्शन मंच ठरले आहे, त्याचबरोबर जगातल्या सर्वोच्च संरक्षण प्रदर्शनापैकी एक आहे. या प्रदर्शनात जगभरातले 1000 हून अधिक संरक्षण उत्पादक आणि 150 कंपन्या सहभागी झाल्या आहेत.


देशाचे पंतप्रधान म्हणून आणि उत्तर प्रदेशचे खासदार म्हणून अशा दोन्ही नात्याने या प्रदर्शनातल्या उपस्थितांचे स्वागत करतांना आपल्याला अधिक आनंद होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जनतेसाठी विशेषत: भारतातल्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. मेक इन इंडियामुळे भारताच्या सुरक्षिततेत वाढ होण्याबरोबरच संरक्षण क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत. यामुळे संरक्षण निर्यातीला भविष्यात चालना मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले.

The Prime Minister, Shri Narendra Modi at the inauguration of the 11th edition of DefExpo2020, at Lucknow, in Uttar Pradesh on February 05, 2020.
The Governor of Uttar Pradesh, Smt. Anandiben Patel, the Chief Minister of Uttar Pradesh, Yogi Adityanath and the Minister of State for AYUSH (Independent Charge) and Defence, Shri Shripad Yesso Naik are also seen.

भारत केवळ बाजारपेठ नव्हे तर संपूर्ण जगासाठी अमाप संधीचे दालन

आजचे संरक्षण प्रदर्शन म्हणजे भारताचे वैविध्य, विशालता आणि जगाचा व्यापक सहभाग यांचे दर्शन आहे. संरक्षण आणि सुरक्षितता या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावण्याच्या दृष्टीने भारत वाटचाल करत असल्याचे हे द्योतक आहे. केवळ संरक्षण उद्योगाशी नव्हे, तर संपूर्ण भारतावर जगाचा असलेला विश्वास या प्रदर्शनातून प्रतित होत आहे. संरक्षण आणि अर्थव्यवस्थेविषयी ज्यांना माहिती आहे, ते भारत केवळ बाजारपेठ नव्हे तर संपूर्ण जगासाठी अमाप संधीचे दालन असल्याचे नक्कीच जाणतात, असे पंतप्रधान म्हणाले.

 

संरक्षणविषयक डिजिटल परिवर्तनात उद्याच्या आव्हानांचे प्रतिबिंब

संरक्षणविषयक डिजिटल परिवर्तन या संरक्षण उत्पादनाच्या उपकल्पनेमध्ये उद्याच्या आव्हानांचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सध्याच्या जीवनात तंत्रज्ञानाची मोठी भूमिका असून, सुरक्षाविषयक आव्हाने गंभीर होत चालली आहेत, केवळ वर्तमानासाठी नव्हे तर, भविष्यासाठीही हे महत्वाचे आहे. संरक्षण दलांमध्ये जागतिक पातळीवर नवनव्या तंत्रज्ञानांचा समावेश केला जात आहे. भारतही यात मागे नाही. अनेक प्रोटोटाईप्स विकसित करण्यात येत आहेत. येत्या 5 वर्षात संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक किमान 25 उत्पादने विकसित करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

 

अटल बिहारी वाजपेयी यांचे स्वप्न साकारतांना

लखनौ इथले संरक्षण प्रदर्शन आणखी एका कारणासाठी महत्वाचे आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्याचे स्वप्न साकारण्याच्या दृष्टीकोनातून अनेक पावले उचलली.

त्यांचाच दृष्टिकोन स्वीकारत आम्ही अनेक संरक्षण उत्पादन निर्मितीला गती दिली. 2014 मध्ये 217 संरक्षण परवाने जारी करण्यात आले. गेल्या 5 वर्षात ही संख्या 460 झाली. जागतिक संरक्षण निर्यातीत भारताचा वाटा वाढला आहे. संरक्षण निर्यात 5 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

 

संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास, राष्ट्रीय धोरणाचा मुख्य भाग

गेल्या 5-6 वर्षात सरकारने संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकास हा देशाच्या धोरणाचा महत्वाचा भाग केला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास आणि उत्पादन यासाठी आवश्यक पायाभूत संरचना तयार करण्यात येत आहे. इतर देशांबरोबर संयुक्त कंपन्या स्थापन करण्याच्या दिशेने काम सुरु आहे. यामुळे गुंतवणुक आणि नवकल्पनेसाठी वातावरण निर्माण होत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

 

वापरकर्ता आणि उत्पादक यांच्यातली भागिदारी

वापरकर्ता आणि उत्पादक यांच्यातल्या भागिदारीमुळेच राष्ट्रीय सुरक्षितता अधिक बळकट करता येऊ शकते.

संरक्षण उत्पादन केवळ सरकारी संस्थांपूरतेच मर्यादित न राहता, खाजगी क्षेत्राबरोबर भागिदारी आणि खाजगी क्षेत्राचा समान सहभागही त्यात असायला हवा, असे त्यांनी सांगितले.

 

नव भारतासाठी नवी उद्दिष्टं

भारतात दोन मोठे संरक्षण उत्पादन कॉरिडॉर बांधण्यात येत आहेत, यापैकी एक तामिळनाडू येथे तर, दुसरा उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत अलिगड, आग्रा, झाशी, चित्रकुट, कानपूर आणि लखनौ इथे नोडस् निर्माण करण्यात येणार आहेत. भारतात संरक्षण उत्पादनाला चालना देण्यासाठी नवी उद्दिष्टं ठेवण्यात आली आहेत.

येत्या 5 वर्षात संरक्षण उत्पादनात 15 हजारपेक्षा अधिक एमएसएमई आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. I-DEX या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी 200 नवे संरक्षण स्टार्ट अप सुरु करण्याचे ध्येय ठेवले आहे. किमान 50 नवी तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. देशाच्या प्रमुख उद्योग संघटनांनी संरक्षण उत्पादनासाठी संयुक्त मंच निर्माण करावा, ज्यामुळे या क्षेत्रातल्या विकास आणि उत्पादन तंत्रज्ञानाचा लाभ त्यांना घेता येईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले.