संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते उद्या सागरी परिषद – 2017 चे उदघाटन

0
797

गोवा:गोवा नौदल महाविद्यालयाने प्रथमच आयोजित केलेल्या गोवा सागरी परिषद –2017 चे उदघाटन बुधवारी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेला भारत, बांग्लादेश, इंडोनेशिया, मालदीव, मलेशिया, मॉरीशस, म्यानमार, सेशल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या देशांच्या नौदल प्रमुखांची उपस्थिती असणार आहे. नौदल अभ्यासक्रमात प्राविण्य, विचारांची देवाणघेवाण आणि भारतीय महाद्वीपातील सागरी समस्यांवर सामुहिक प्रयत्नांच्या माध्यमातून तोडगा काढणे हा या परिषदेचा उद्देश आहे.     

दोन दिवसीय परिषदेची संकल्पना प्रादेशिक सामुद्रिक आव्हानांचा मुकाबला ही असून वाढते सागरी धोके, शस्त्रदलांची पुनर्रचना, जागरुकता, याविषयावर परिषदेत भर दिला जाणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी चर्चासत्र तर दुसऱ्या दिवशी नौदलप्रमुखांमध्ये संवाद साधला जाणार आहे. अनौपचारिक चर्चेच्या माध्यमातून सामाजिक संबंध सुधारणा हेही परिषदेदरम्यान नियोजित आहे. यामुळे राष्ट्रांमध्ये परस्पर पारदर्शकता, मैत्री आणि सहकार्य वृद्धींगत होण्यास मदत होईल.   

 

भारतीय महाद्वीप 21 व्या शतकात व्यूहात्मतक रचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. म्हणून शेजारी राष्ट्रांना औपचारिक आणि अनौपचारिकरित्या एकत्र आणण्यासाठी अशाप्रकारच्या परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. गोवा नौदल महाविद्यालय, जे यापूर्वी कॉलेज ऑफ नेवल वारफेर या नावाने ओळखले जात होते त्याचे उदघाटन 17 सप्टेंबर 1988 रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री के सी पंत यांच्या हस्ते करण्यात आले होते. तेंव्हापासून आतापर्यंत महाविद्यालय देशातील एक प्रमुख संरक्षण संस्था म्हणून उदयास आले आहे.