संकेतच्या गणेशमूर्तीला नाचणीच्या अंकुराचे दागिने

0
1236
गोवा खबर:प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती पर्यावरणाला घातक   असतात.त्यामुळे चिकण मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तीचे पूजन करा, असा आग्रह पर्यावरण प्रेमी दरवर्षी धरत असतात. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे.मात्र या मूर्ती पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत.
उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील मांद्रे येथील संकेत मांद्रेकर हा निस्सीम गणेश भक्त.त्याला सुद्धा आपला गणपती बाप्पा पर्यावरण पूरक असावा अस नेहमी वाटायच.गेल्या वर्षी पर्यंत त्याच्या डोक्यात आपण काही तरी वेगळ करून लोकांमध्ये चांगला संदेश जाईल अस काही तरी कराव,अस वाटत होत.त्याने छोटासा प्रयत्न देखील करून पाहिला होता.मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.
यावर्षी त्याने पुन्हा एकदा गणरायाची पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्याच ठरवल.
दरवर्षी ज्या गणपती शाळेत मूर्ती बनवायला दिली जाते तेथेच संकेतने यंदा आपल्या घरातील मूर्ती स्वतः साकारली.ही मूर्ती खास अशीच बनली आहे. संकेतने अगदी चिकण माती मळण्यापासून तयार झालेली माती साच्यात घालून मूर्ती बनवण्यापर्यंत सगळी कामे स्वतः केली.ही मूर्ती साकारत असताना त्यात ठराविक ठिकाणी भूसा भरला.मूर्ती बनवून होताच त्याला पारंपरिक पद्धतीने रंगवण्या ऐवजी त्याने मूर्तीला मातीच्याच रंगात ठेवली.गणपतीच्या पंचासाठी त्याने लाकडाच्या भुशाचा खुबिने वापर केला. अगदी किरकोळ ठिकाणी आवश्यक तेवढाच रंगाचा वापर संकेतने केला.
मूर्ती घडवत असताना कानाच्या पळ्या,सोंड, आणि अंगावरील दागीन्यांमध्ये त्याने नाचणीच्या बिया रोवल्या. गणपती बनवून होईपर्यंत त्याला कोंब फुटले होते.चिकण मातीच्या रंगातील नैसर्गिक गणपती आणि हीरव्यागार नाचणीच्या अंकुराच्या नक्षी मुळे संकेतने साकारलेल्या गणपती खऱ्या अर्थाने निसर्ग देवता वाटत आहे.
विशेष म्हणजे शिक्षणाने मॅकेनिकल इंजीनियर परंतु व्यवसायाने कलाकार  असलेल्या संकेतने या सर्व प्रक्रियेचा व्हिडिओ करून यूट्यूबवर अपलोड केला आहे.आपला संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो गणेश भक्तांपर्यंत पोचेल आणि गणेशोत्सव यापुढे निसर्ग उत्सव ठरेल, अशी आशा संकेतने बाळगली आहे.
संकेतने राष्ट्रीय मनोरंजन वाहीन्यांवरील कार्यक्रमात देखील आपली छाप सोडली आहे.एमटीव्ही वरील कलर्स ऑफ यूथ कार्यक्रमात त्याने अंतिम फेरी गाठली होती.त्याशिवाय इंडिया के मस्त कलंदर फेम इंडियाज गॉट टैलेंट मध्ये संकेत सहभागी झाला होता.