श्री सत्यनारायण महिला भजनी मंडळाचे उपक्रम प्रशंसनीय: गावडे

0
1124

गोवा खबर:कला व संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे यांनी आस्कण-पर्तळ, शिरोडा येथील श्री सत्यनारायण महिला भजनी मंडळाने राज्यातील ग्रामीण भागात भजन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.

श्री सत्यानारायण महिला भजनी मंडळाने कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने शि   रोडा येथील श्री सत्यनारायण देवस्थानाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अखिल गोवा महिला भजन महोत्सव २०१९ च्या दुसऱ्या महोत्सवात बोलताना श्री गावडे यांनी श्री सत्यनारायण महिला मंडळाने केवळ दोन वर्षांच्या कालावधीत कला व संस्कृतीच्या समृद्धीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन प्रयत्न केले ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

आमदार  सुभाष शिरोडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माहिती अधिकारी  प्रकाश नाईक, पंचायत सदस्य  शिवानंद नाईक,  शिवनाथ देवस्थानचे अध्यक्ष  म्हाड्डू प्रभुगांवकर, श्री सत्यनारायण देवस्थानचे अध्यक्ष श्रीधर नाईक हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पुढे बोलताना  गावडे यांनी श्री सत्यनारायण महिला मंडळाला त्यांच्या भावी प्रयत्नांना पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.

आमदार श्री सुभाष शिरोडकर यांनी यावेळी बोलताना समाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी श्री सत्यनारायण महिला भजनी मंडळाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रमुख महिला भजनी स्पर्धा तसेच महोत्सव या मंडळाने सहभाग घेतला आहे आणि अनेक बक्षिसेही मिळवलेली आहेत ही खरोखरच प्रशंसनीय बाब असल्याने ते पुढे म्हणाले.

माहिती अधिकारी  प्रकाश नाईक यावेळी बोलताना म्हणाले की, पारंपारीक कला प्रकारात भजन, धालो, फुगडी लोकसंगीत इत्यादींचा समावेश होत असतो. श्री सत्यनारायण महिला भजनी मंडळ भजन कलेच्या समृद्धी साठी प्रयत्न करीत आहे, असे त्यांनी सांगितले. श्री सत्यनारायण महिला भजनी मंडळाचे संस्थापक तथा महोत्सवाचे समन्वयक श्री शंकर नाईक यांनी महोत्सव यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल श्री नाईक यांनी त्यांची प्रशंसा केली.

सुरुवातीस श्री सत्यनारायण महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती सविता नाईक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. श्रीमती वंदना पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सदर महोत्सवात गोव्यातील विविध भागातून एकूण दहा महिला भजनी मंडळानी भाग घेतला. श्री शिव समर्थ सांस्कृतिक मंडळ, वास्को, श्री भाविका देवी महिला मंडळ, दिवाडी, श्री भुमिका महादेव कर्वेश्वर महिला भजनी मंडळ साळ, डिचोली,श्री महागणपती महिला भजनी मंडळ, आमोणा आणि श्री अमरावती महिला भजनी मंडळ, आमोणा यांना उत्कृष्ट भजनी पथके म्हणून घोषीत करण्यात आले.

श्री भूमिकादेवी मंडळ दिवाडीच्या कुमारी प्रज्ञा रावल यांना उत्कृष्ट गायक, साळ डिचोलीतील श्री भुमिका महादेव कर्वेश्वर महिला भजनी मंडळाच्या कुमारी शारदा शेटकर यांना उत्कृष्ट गवळण गायक, आणि श्री शिव समर्थ वास्को, श्री तोणयेश्वर महिला भजनी मंडळाचे श्री ओमकार गांवकर यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक व पखवाज वादक म्हणून घोषीत करण्यात आले.

शिरोडा पंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर, पंचायत सदस्य  शिवानंद नाईक आणि भजन कलाकार प्रेमानंद नरसिंह शेट वेलिंगकर हे समारोप कार्यक्रमाला उपस्थित होते.