श्रीलंकेला फॉलोऑन

0
1057

दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंका संघाची पळता भुई थोडी केली असून लंकेचा घरच्या मैदानावरच अवघ्या १८३ धावांत खुर्दा झाला आहे. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने १६.४ षटकांत ६९ धावांच्या बदल्यात ५ बळी टिपले आहेत. दरम्यान, भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिले असून लंकेपुढे डावाने पराभव टाळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

कालच्या २ बाद ५० धावांवरून श्रीलंका संघाने आज फलंदाजीला सुरुवात केली मात्र पडझड थांबवण्यात लंकेच्या एकाही फलंदाजाला यश आलं नाही. लंकेच्या डावात केवळ निरोशन डिकवेला हा मधल्या फळीतील फलंदाज अर्धशतकी खेळी करू शकला. बाकी एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही.

भारताकडून सर्वाधिक ५ बळी अश्विनने टिपले तर मोहम्मद शमी आणि जाडेजाने प्रत्येकी दोन व उमेश यादवने एक बळी टिपला. अवघ्या ४९.४ षटकांत श्रीलंकेचा संपूर्ण संघ माघारी परतला. भारताला ४३९ धावांची भक्कम आघाडी मिळाल्याने भारताने लंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे.

अश्विनने २६ वेळा एका डावात ५ गडी गारद करण्याची किमया केली असून त्याने याबाबतीत हरभजन सिंगला मागे टाकले आहे. भारताकडून एका डावात सर्वाधिक वेळा ५ गडी बाद करण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने ३५ वेळा डावात ५ बळी टिपले आहेत.