श्रीमंतांची भलावण करण्याच्या भाजपच्या धोरणाने सामान्य माणुस देशोधडीला : गिरीश चोडणकर

0
294
गोवा खबर : केंद्रातील भाजप सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या श्रीमंत मित्रांची भलावण करण्याचे एकमेव धोरण आहे. मागील सहा वर्षात केवळ आपल्या स्वार्थासाठी भाजपने कष्टकरी सामान्य माणसाला देशोधडीस लावुन दिवाळखोर केले आहे ,असा आरोप काॅंग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काॅंग्रेस हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. 
यावेळी उत्तर गोवा जिल्हा काॅंग्रेस अध्यक्ष विजय भिके, सरचिटणीस सचिन परब, डिचोली गट अध्यक्ष मेघश्याम राऊत, मांद्रे गट निमंत्रक नारायण रेडकर, साखळी गट अध्यक्ष मंगलदास नाईक हजर होते.
आज केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाने संपुर्ण देशात आर्थिक आणिबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे. भाजपच्या श्रीमंताच्या हातात अख्खा देश देण्याच्या धोरणाने  आज देशातील शेती उत्पादन केवळ धनदांडग्यांच्या हातात देण्याचा डाव भाजपने आखला आहे. त्यामुळेच देशातील शेतकरी आता  रस्त्यावर उतरला आहे. काल भाजपने लोकशाही मुल्यांची पायमल्ली करत राज्यसभेत शेती विधेयक मंजुर केले व लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला आहे.
भाजपला गरीब जनतेचे काहीच पडलेले नाही हेच कालच्या घटनेने परत एकदा सिद्ध केले आहे असे चोडणकर म्हणाले.
कोविड महामारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अविचारी व सपशेल फसलेल्या राष्ट्रव्यापी लाॅकडाऊनने  आज देशाची अर्थव्यवस्था कोसळली आहे. त्यामुळे गोव्यातील छोट्या व्यापाऱ्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली. आज स्थानिक भाजप सरकारने आपल्या असंवेदनशीलपणाने गोव्यात आर्थिक आणिबाणी निर्माण केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
आज मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला श्रीमंत लोकांच्या उपस्थितीत वाढदिवस, जयंती या सारखे उत्सव साजरे करण्यास वेळ आहे, परंतु कष्टकरी व संकटात सापडलेले मोटर सायकल पायलट, रिक्शा, टॅक्सी, टेम्पो व बस मालक, हाॅटेल-खाणावळी व शॅक्स चालक, खाण अवलंबित, बेकरी, चर्मोद्योग, शिंपी व्यावसायीक , खाजेकार, फुलकार, काकणकार तसेच इतरांच्या व्यथा ऐकण्यासाठी वेळ नाही,असा आरोप चोडणकर यांनी केला.
चोडणकर म्हणाले,आपल्या मासीक पेंशनासाठी सहा सहा महिने वाट पाहणारे ज्येष्ठ नागरीक, दिव्यांग, विधवा, खलाशी तसेच इतर समाज कल्याण योजनांचे लाभार्थी, कोविड संकटात सेवा बजावणारे परंतु सुरक्षा कवच व पिपीई किट पासुन वंचित आरोग्यसेवा कर्मचारी, महिना अखेरीस पगार न मिळणारे सरकारी कर्मचारी यांच्या समस्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन भाजप सरकार केवळ राजकीय लाभ उठविण्यासाठी उत्सव साजरे करीत आहे.
आज देशातील युवक नोकरीच्या शोधात आहे. भाजप सरकारकडे रोजगाराचा कोणताच कृती आराखडा तयार नाही,असे सांगून चोडणकर म्हणाले, गोव्यातही सरकारने सर्व सरकारी नोकऱ्यांची भरती तडकाफडकी स्थगीत ठेवुन शिक्षीत युवकांवर अन्याय केला. अनेक सरकारी खात्यांमध्ये सर्व सोपस्कार पुर्ण झालेल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सरकारने का स्थगित ठेवली हे स्पष्ट करावे व सर्व सरकारी नोकऱ्यांची निवड प्रक्रीया ताबडतोब पारदर्शक पद्धतीने चालीस लावावी.
  • सरकारी कर्मचाऱ्यांची हक्काचे घर बांधणी कर्ज योजना सरकारने हुकूमशाही मार्गाने बंद केली व सदर निर्णयाला न्यायालयात दाद मागण्याचे वा न्याय हक्कासाठी आंदोलन करण्याच्या लोकशाही हक्कावरही अध्यादेशाने गदा आणली हे धक्कादायक व दुर्देवी आहे. या निर्णयांने घरांसाठी कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले असुन, त्यांच्यावर आज आभाळ कोसळले आहे असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 
आज भाजप सरकार अवाजवी व वायफळ खर्च करण्यात व्यस्त आहे. खर्चकपात करण्याचे सोडुन केवळ आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी तसेच कमिशन खाण्यासाठी आज सरकार अनाठायी खर्च करीत आहे,असा आरोप करत गोव्यातील भाजप सरकारने लोकांच्या समस्यांकडे  लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेच्या भावनांशी खेळण्याचे त्वरित थांबवावे असा इशारा  चोडणकर यांनी दिला आहे.