श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दुसऱ्या जागतिक होमिओपथी परिषदेचे 23 रोजी उदघाटन

0
1019
गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दुसऱ्या जागतिक समग्र औषधी मंचाचे बुधवार, 23 जानेवारी रोजी पणजी येथे उदघाटन करण्यात येणार आहे. ‘जागतिक सहकार्याने होमिओपथी उत्पादनांचे नियमन’ अशी 23-25 जानेवारीदरम्यान चालणाऱ्या परिषदेची संकल्पना आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपथीने या परिषदेचे आयोजन केले आहे. फ्रान्स, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जिअम, स्पेन, रशिया, ब्राझील, क्युबा, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती, थायलंड, मलेशिया, ओमन, इंडोनेशिया, बांग्लादेश, नेपाळ या देशातील होमिओपथीशी निगडीत औषधी नियामकांचा परिषदेत सहभाग असणार आहे. 
नियामक सहयोग, किमान नियामक आणि कायदेशीर मानके, सुरक्षा आणि गुणवत्ता मानक वाढवणे, मानकीकरणातील जटीलता कमी करणे, होमिओपथी एक समग्र उपचारपद्धती आणि पशुवैद्यकीय होमिओपथी म्हणून मान्यता देणे या विषयांवर परिषदेची संकल्पना आहे.
होमिओपथी उपचारपद्धती रुग्णकेंद्रीत करण्यासाठी होणाऱ्या चर्चेत विविध देशांतील होमिओपथी कंपन्यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय लेखक, वैज्ञानिक तज्ज्ञ आणि प्रमुख होमिओपथी संघटनेच्या डॉक्टरांची परिषदेसाठी उपस्थिती असणार आहे.