श्रीपाद नाईक यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकावर विविध विकासकामांचा पायाभरणी सोहळा

0
881

 गोवा खबर :  केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज मडगाव रेल्वे स्थानकावर विविध विकासकामांचा पायाभरणी सोहळा पार पडला. यात केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून मडगाव, करमळी आणि थिवी रेल्वेस्थानकांवर विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

यात प्रवाशी आगमन केंद्र, मडगाव आणि थिवी येथे पार्किंग इमारत, स्थानकांमध्ये सुधारणा, रस्ते जोडणी, पदपथ, प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, फिरता जिना या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. तर, मडगाव आणि माजोर्डा स्थानकांदरम्यान क्षमता वाढ करुन एक बेटावरील प्लॅटफॉर्म (आयलंड प्लॅटफॉर्म) आणि लूप लाईनची निर्मिती करण्यात येणार आहे. 44 कोटी रुपये खर्चून ही कामे करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे आणि राज्याच्या विकासासाठी नेहमीच मदतीचा प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी श्रीपाद नाईक यांनी केले. रेल्वेची विकासकामे झाल्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होते, असे ते म्हणाले.

याशिवाय मडगाव रेल्वे स्थानकावर सोलार प्रकल्पाच्या माध्यमातून 180 किलोवॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रणाली उभारली जाणार आहे. यासाठी दक्षिण गोव्याचे खासदार श्री नरेंद्र सावईकर यांनी खासदारनिधीतून 1.81 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर, थिवी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म सरफेसिंग केली जाणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद राज्यसभा खासदार श्री विनय तेंडूलकर यांनी खासदारनिधीतून केली आहे. प्लॅटफॉर्म सरफेसिंग झाल्यानंतर प्रवाशांना सामानाची वाहतूक करणे सुलभ होईल.

या विकासकामांच्या पायाभरणी सोहळ्यानंतर मडगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म निवाऱ्याचे उदघाटन करण्यात आले. यामुळे ऊन आणि पावसाच्या त्रास कमी होईल. या कामासाठी खासदार श्री नरेंद्र सावईकर यांनी खासदारनिधीतून 2.04 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.