श्रीपाद नाईक यांच्या हस्ते थिवी रेल्वेस्थानकावर विकासकामांचा पायाभरणी सोहळा

0
1110

 गोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज थिवी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म निवाऱ्याचा पायाभरणी सोहळा पार पडला. खासदारनिधीतून या कामासाठी 90 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, करमळी रेल्स्थानकावर श्रीपाद नाईक यांनी आजपासून थांबा मिळालेल्या गाडी क्रमांक 12133/12134 मेंगलोर जंक्शन- मुंबई गाडीला हिरवा झेंडा दाखवला.  

पावसाळा आणि उन्हाळ्यात प्रवाशांना होणारा त्रास पाहता प्लॅटफॉर्म निवारा उभारण्याची नितांत आवश्यकता होती, ती लवकरच पूर्ण होईल. तसेच करमळी रेल्वेस्थानकावर मेंगलोर-मुंबईला जलद गाडीला थांबा मिळाल्यामुळे टॅक्सी आणि इतर व्यावसायिकांना लाभ होईल, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

कोकण रेल्वेसाठी यापूर्वीही पेडणे रेल्वेस्थानकासाठी खासदारनिधीतून 25 लाख रुपये दिल्याचे श्री नाईक म्हणाले. जनतेच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचा कोकण रेल्वेचा नेहमीच प्रयत्न असतो.

राज्यात रेल्वे आणि इतर विकासकामांबाबत नेहमीच प्रयत्नरत असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पर्यटनमंत्रीपदी असताना रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 8 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. तो आता मंजूर झाला आहे. रेल्वेमंत्री आणि केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच या कामाचाही शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली.