श्रीपाद नाईक यांचा मंत्रीमंडळात समावेश:अभिनंदनाचा वर्षाव

0
995
गोवा खबर:उत्तर गोव्यातून भाजपच्या उमेदवारीवर सलग पाच वेळा निवडून आलेल्या श्रीपाद नाईक यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात समावेश नक्की झाला आहे.नाईक यांना शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण आले आहे.सायंकाळी नवी दिल्ली येथे होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात नाईक मंत्री पदाची शपथ घेतील.

यावेळी मोदी मंत्री मंडळात नाईक यांचा समावेश होईल की नाही याबाबत सकाळ पर्यंत कोणतीच निश्चितता नव्हती.नाईक यांचा मंत्रीमंडळात समावेश व्हावा अशी गोमंतकीयांची इच्छा होती.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल नाईक यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे यासाठी आपण आग्रही असल्याचे मत व्यक्त केले होते.स्वतः नाईक यांनी आपण मात्र कोणत्याच प्रकारचे लॉबिंग करणार नसून पक्ष देईल ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.

नव्या मंत्रीमंडळात कोणाचा समावेश होणार याचा उलगडा झालेला नसल्याने इतर नेत्यां प्रमाणे श्रीपाद नाईक हे देखील आज सकाळ पासून मोदी यांच्या निरोपाची वाट बघत होते.दुपारी शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहून शपथ घेण्याचा निरोप आल्या नंतर भाऊ समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
नाईक यावेळी 80 हजारांचे मताधिक्य घेऊन सलग पाचव्यांदा उत्तर गोव्यातून विजयी झाले आहेत.नाईक यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि गेल्या वेळच्या मोदी सरकार मध्ये विविध खात्याची मंत्रीपदे सांभाळली आहेत.गेल्या वेळी आयुष मंत्री म्हणून काम करताना योगा आणि आयुर्वेद यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम नाईक यांनी केले होते.नाईक यांच्या कामगिरी वर पंतप्रधान नरेंद्र मोदी समाधानी होते.त्यामुळेच त्यांना पुन्हा संधी मिळाली आहे,असे नाईक समर्थकांचे म्हणणे आहे.
यावेळी नाईक यांच्या कडे कोणते खाते दिले जाणार हे स्पष्ट झालेले नाही.गेल्या वेळी त्यांच्याकडे आयुष या नव्या खात्याचा स्वतंत्र प्रभार दिला होता.यावेळी त्याच पद्धतिची जबाबदारी मिळते की कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळते याचे उत्तर जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्या बद्दल श्रीपाद नाईक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद तानावडे आणि मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी नाईक यांचे अभिनंदन केले.