गोवा खबर:गोव्याचे नामांकित लेखक व गीतकार स्व श्रीधर कामत यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या जयंतीदिनी 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे.
श्रीधर कामत यांचा कवितासंग्रह, गीतसंग्रह व त्यांच्या एकांकिका संग्रह ‘जैत’ चे प्रकाशन संजना पब्लिकेशन्स तर्फे होईल.
स्व श्रीधर कामत हे गोव्यातील एक नामवंत कवी व गीतकार होते व त्यांना महाराष्ट्र राज्यातील देखील पुरस्कार लाभले होते. एक नाटककार म्हणून मान्यता पावतानाच स्व कामत यांनी विद्यार्था आंदोलन व गोवा बचाव अभियानाच्या ऐतिहासिक आंदोलनाचेही नेतृत्व केले होते.मडगांव रविन्द्र भवनचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते.
सुप्रसिद्ध भारतीय नाटककार व स्व कामत यांचे स्नेही श्री सलिम अरिफ यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन होईल. राष्ट्रीय कीर्तीचे गोमंतकीय लेखक श्री दामोदर मावजो या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
यावेळी श्रीधर कामत यांच्या गीतांवर आधारित गायन व नृत्याचाही कार्यक्रम होईल.
हा कार्यक्रम शनिवार 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 4.30 वाजता मडगावच्या गोमंत विद्या निकेतनच्या प्रमुख सभागृहात संपन्न होईल.