‘शौर्य’ गस्ती नौका भारतीय तटरक्षक दलाच्या सेवेत दाखल

0
1303
भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात आज ‘शौर्य’ ही गस्ती नौका दाखल झाली. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘शौर्य’ चे लोकार्पण करण्यात आले. गोवा शिपयार्डमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक, राजेंद्र सिंग, गोवा शिपयार्डचे मुख्य प्रबंधक रिअर ऍडमिरल शेखर मित्तल यांची उपस्थिती होती.
भारतीय तटरक्षक दलाने विशेष आर्थिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आतापर्यंत कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे धर्मेंद्र प्रधान यावेळी म्हणाले. शौर्य सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेल्या गस्तीनौकेमुळे भारतीय तटरक्षक दलाचे सामर्थ्य आणखी वाढणार आहे. गोवा शिपयार्डने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन जगातील तंत्रज्ञानापेक्षा आपण कमी नसल्याचे दाखवून दिल्याचे धर्मेंद्र प्रधान म्हणाले.
याप्रसंगी बोलताना भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग यांनी निर्धारीत वेळेपेक्षा लवकर जहाजबांधणी पूर्ण केल्याबद्दल गोवा शिपयार्डचे कौतुक केले.
शौर्य गस्ती नौका 105 मीटर लांबीची आहे. यावर अत्याधुनिक संप्रेषण साधने, सेन्सॉर्स आणि मशीनरी आहे. शोध आणि बचावकार्य, सागरी गस्ती तसेच तेलगळतीच्या कामासाठी शौर्य उपयुक्त आहे.
शौर्य गस्ती नौकेचा तळ चेन्नई येथे असणार आहे. सध्या भारतीय तटरक्षक दलाकडे 129 जहाज आणि नौका आहेत. तर, देशातील वेगवेगळ्या शिपयार्डसमध्ये अनेक जहाजांच्या बांधणीचे काम सुरु आहे.