‘शोधताना’ हे पुस्तक एक दस्ताऐवज ठरेल   डॉ. सोमनाथ कोमरपंत यांचे प्रतिपादन, सुहास बेळेकरांच्या पुस्तकाचे प्रकाशन  

0
1044
शोधताना या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. सोमनाथ कोमरपंत, रमेश वंसकर, डॉ. प्रदीप म्हस्के, गोरख मांद्रेकर, सुहास बेळेकर.
गोवाखबर:‘शोधताना’ या पुस्तकात  सुहास बेळेकर यांनी संसदीय लोकसंकेतांचा अभ्यास करून केलेली मांडणी प्रशंसनीय आहे. विधानसभेचे मूल्यमापन केले आहे. तो ज्ञात इतिहास आहे व तो सामाजिक, सांस्कृतिक दस्ताऐवज ठरू शकतो. त्यांनी अभिनिवेष विरहीत वस्तूूनिष्ठ मूल्यमापन केले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी केले.
गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रागांझाच्या परिषदगृहात ‘दैनिक हेराल्ड’चे सहयोगी संपादक सुहास बेळेकर यांच्या ‘शोधताना’ पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी डॉ. कोमरपंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खास निमंत्रित डॉ. प्रदीप म्हस्के,  गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव गोरख मांद्रेकर, सुहास बेळेकर उपस्थित होते.
आज संपूर्ण क्षेत्र राजकारणाने व्यापलेले आहे. त्यामुळे इतर सम्यक गोष्टींकडे कुणाचे लक्ष गेलेले नाही. याकडे निर्देश करून डॉ. कोमरपंत यांनी सांगितले की, बेळेकर पंचवीस वर्षे पत्रकारितेत आहेत. परंतु त्यांची पत्रकारिता  रिंगणापुरती मर्यादित नाही. त्यांची शोध घेण्याची वृत्ती आहे. अठरा प्रकरणांपैकी ‘पहिल्या विधानसभेचा पहिला दिवस’ या प्रकरणात त्यांनी रोमांचकारी घटनांचा उल्लेख केला आहे.
डॉ. म्हस्के म्हणाले की, ‘शोधताना’मध्ये वस्तूनिष्ठ लेखन आहे. पंडित नेहरुंमुळे गोवामुक्तीला विलंब झाला असे म्हटले जाते. मात्र, त्या विषयी अभ्यासाअंती बेळेकर यांनी नेहरूंचे समर्थन केले आहे. यु.गो.पा.चा इथला उदय, त्यावेळचा चर्च संस्थेचा अजेंडा, कॉंगे्रस पक्षापुढे कोणती आव्हाने होती, सांस्कृतिक राष्ट्रवादाला धरून विलीनीकरणाचा आलेला मुद्दा व त्यात राजकीय भूमिका काहीही नव्हती, या गोष्टींवर बेळेकरांनी केलेल्या भाष्यविषयी डॉ. म्हस्के यांनी उहापोह केला. तसेच गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर यांच्या कारकिर्दीत राजभाषेचा प्रश्‍न कसा होता व मराठी भाषा ही परप्रांतीय भाषा आहे असा हेतूपुरस्सरपणे कसा प्रचार केला गेला या बाबींनाही त्यांनी स्पर्श केला.
गोरख मांद्रेकर यांनी साहित्य समीक्षेसंदर्भात कार्यक्रम होण्याची गरज व्यक्त केली. रमेश वंसकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जयप्रभू कांबळे यांनी केले.