शेळ मेळावलीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी आयआयटी विरोधकांशी केली चर्चा

0
548
लोकांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेणार:मुख्यमंत्री
 गोवा खबर: प्रस्तावित गुळेली आयआयटी प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज शेळ मेळावलीत जाऊन विरोधकांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. लोकांना विश्वासात घेऊनच आयआयटी बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.ग्रामस्थ मात्र आयआयटी नकोच या भूमिकेवर ठाम राहिल्याने आणखी काही दिवस हा विषय चिघळत राहण्याचे संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी  स्थानिक मंदिरात ग्रामस्थां सोबत बैठक घेउन सरकारची बाजू मांडली. सरकार जनभावनेचा आदर करत असल्याची ग्वाही देत पूर्ण गावच्या लोकांसोबत चर्चा करणे शक्य होणार नसल्याने ग्रामस्थांनी 15 लोकांची समिती नेमावी आणि सरकारला चर्चेसाठी निमंत्रित करावे,असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.
यापूर्वी देखील मुख्यमंत्री सावंत यांनी आयआयटीला विरोध करणाऱ्या शेळ मेळावली ग्रामस्थांना पणजी येथे चर्चेसाठी बोलावून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी शेळ मेळावलीत जाऊन प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी करून मोठ्या संख्येने जमलेल्या विरोधकांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री म्हणाले, लोकांच्या मतानुसारच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही स्थितीत लोकांच्या मताचा अनादर केला जाणार नाही.ग्रामस्थांनी 15 जणांची समिती बनवून सरकारला चर्चेसाठी बोलवावे.आम्ही लोकांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेणार नाही.
राज्यात कुठल्या गोष्टीला विरोध असेल तर आंदोलन करण्याची गरज नाही.आपल्याशी येऊन चर्चा करा.चर्चेतून तोडगा काढता येतो,असे जाहिर आवाहन यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री स्वतः आयआयटी विरोधकांशी चर्चा करण्यासाठी शेळ मेळावलीत जाणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले होते.